मुळदेत घर भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी

By admin | Published: June 2, 2016 12:33 AM2016-06-02T00:33:26+5:302016-06-02T00:39:52+5:30

अनर्थ टळला : साहित्य खाक, लाखो रुपयांची हानी

At home in the grounds of a fiery fox | मुळदेत घर भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी

मुळदेत घर भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी

Next

कुडाळ : तालुक्यातील मुळदे-मधलीवाडी येथील सीताराम पालव यांच्या घराला बुधवारी भरदुपारी आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून भस्मसात झाले. यावेळी घरात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, पावसाच्या तोंडावर संपूर्ण घराचे छप्पर व घरातील सर्व साहित्य जळून गेल्याने पालव कुटुंबीयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.
बुधवारी मुळदे येथील श्री देव लिंगेश्वर मंदिरात संप्रोक्षण विधी व धार्मिक कार्यक्रम असल्याने सीताराम पालव व त्यांची पत्नी मंदिरात गेली होती, तर त्यांची दोन्ही मुले शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतात. त्यामुळे त्यांच्या घरी कोणीच नव्हते. दरम्यान, दुपारी त्यांच्या बंद असलेल्या घरातून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ मंदिराकडे जमलेल्या ग्रामस्थांना याबाबत कल्पना दिल्यानंतर ग्रामस्थांनी पालव यांच्या घरी धाव घेतली. तोपर्यंत संपूर्ण घराने पेट घेतला होता.
तेथून जाणाऱ्या रिक्षाचालकांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले; पण ते निष्फळ ठरले. पालव यांच्या घराच्या मागच्या बाजूला आगीचा बंब असून, त्याच्या बाजूलाच लाकडे, शेणी, आदी साहित्य ठेवले होते. त्यामुळे काही क्षणातच आगीचा मोठा भडका उडून छपराचे पत्रेही फुटले. आग लागल्याची घटना कळताच पालव यांच्या घरी जमलेल्या ग्रामस्थांनी पंपाचे आणि तेथीलच बंटी तुळसकर यांच्या टँकरच्या साहाय्याने पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, भरदुपारची वेळ असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. (प्रतिनिधी)
अन् छप्पर कोसळले
भरदुपारी लागलेल्या या आगीने छपराचे सर्व वासे, रिपा भस्मसात झाल्या. यामुळे काही क्षणातच घराचे संपूर्ण छप्पर खाली कोसळले. घटनेची माहिती कुडाळ एमआयडीसीच्या अग्निशामक दलाला देण्यात आली. काही क्षणातच अग्निशामक दलाने बंबासहित घटनास्थळी दाखल होत योग्य नियोजन करून आगीवर नियंत्रण मिळविले.
ग्रामस्थांचे प्रसंगावधान
आगीची तीव्रता लक्षात येताच प्रसंगावधान राखत काही ग्रामस्थांनी मोठ्या प्रयत्नाने घरात घुसून गॅस सिलिंडर तसेच हाताला मिळेल ते महत्त्वाचे साहित्य बाहेर काढले.

Web Title: At home in the grounds of a fiery fox

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.