भूमिहिनांसाठी ‘घरकूल जागा अर्थयोजना’
By Admin | Published: April 13, 2016 10:13 PM2016-04-13T22:13:24+5:302016-04-13T23:30:16+5:30
दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना फायदा : घरकुलाच्या जागेचाही आता प्रश्न सुटणार
रत्नागिरी : दारिद्र्यरेषेखालील घरकुलपात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाच्या लाभापासून वंचित आहेत, ही बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्यरेषेखालील भूमिहिनांसाठी ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा अर्थसहाय्य योजना’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्र शासन पुरस्कृत इंदिरा आवास योजना व राज्य पुरस्कृत अन्य योजनेतील दारिद्र्यरेषेखालील घरकुलपात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाच्या लाभापासून वंचित आहेत, अशा भूमिहीन बेघर कुटुंबांना घरकुल बांधकामास जागा खरेदी करण्यासाठी ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना’ शासनाने जाहीर केली आहे. ही योजना इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजना या योजनेतील दारिद्र्यरेषेखालील घरकुलपात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभधारकांना लागू होणार आहे.
या योजनेअंतर्गत जागा खरेदी करण्यासाठी ५० हजारपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी ५०० चौरस फूटपर्यंत जागा प्रति लाभार्थी खरेदी करता येईल.
मोठ्या ग्रामपंचायती तसेच शहराशेजारील ग्रामपंचायतीमध्ये जागेचे जास्त दर व जागेची कमी उपलब्ध विचारात घेता, ५०० चौरसफुटापर्यंत जागेत स्थानिक प्राधिकरणाच्या बांधकामाच्या नियमावलीनुसार दोन किंवा तीन लाभार्थ्याच्या संमतीने दोन मजली (जी +१) किंवा तीन मजली (जी+२) इमारत बांधण्यासाठी प्रति लाभार्थी ५० हजार अर्थ सहाय्य देता येईल.
याप्रमाणे भूमिहीन, बेघर कुटुंबांना जागा उपलब्ध करुन घेण्यासाठी गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समिती मार्फत जागा खरेदीस मान्यता देण्यात येईल. याचा लाभ घेणेसाठी लाभार्थीने जागा खरेदीबाबत खरेदीखत (रं’ी अॅ१ीीेील्ल३) सादर करणे आवश्यक राहील.
त्याचप्रमाणे जागा खरेदी केल्याचे खरेदीखत ग्रामसभेमध्ये अवलोकनार्थ ठेवण्यात येईल, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)