खांबाळेतील रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा, मोठी रक्कम दिली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 05:23 PM2020-08-20T17:23:38+5:302020-08-20T17:24:51+5:30
खांबाळे चव्हाटेवाडी येथील रिक्षाचालक लवू रामकृष्ण पवार यांना त्यांच्या रिक्षात सापडलेली रक्कम त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन करून प्रामाणिकपणा जपला.
वैभववाडी : खांबाळे चव्हाटेवाडी येथील रिक्षाचालक लवू रामकृष्ण पवार यांना त्यांच्या रिक्षात सापडलेली रक्कम त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन करून प्रामाणिकपणा जपला.
पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या उपस्थितीत ही रक्कम पोलिसांच्या ताब्यात दिली. त्यांनी पवार यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करीत ज्यांची ही रक्कम आहे; त्यांनी ती ओळख पटवून घेऊन जावी, असे आवाहन केले आहे.
रिक्षाचालक पवार हे मंगळवारी दिवसभर प्रवाशांना ने-आण करीत होते. दिवसभरानंतर सायंकाळी त्यांनी रिक्षा घरी नेली. त्यावेळी त्यांना रिक्षात एक पिशवी पडलेली आढळून आली. त्यामुळे त्यांनी त्या पिशवीत पाहिले असता काही रक्कम असल्याचे दिसून आले.
त्यामुळे सुरुवातीला ज्या ओळखीच्या लोकांची ने-आण केली त्यांच्याकडे त्यांनी विचारणा केली. परंतु कुणीही आपली रक्कम गहाळ झाल्याचे सांगितले नाही. त्यामुळे लवू पवार यांनी ती रक्कम पोलिसांकडे जमा केली.
पवार यांचे कौतुक
पवार यांनी आपल्या रिक्षात सापडलेली ती रक्कम पोलीस निरीक्षक जाधव यांच्या उपस्थितीत पोलिसांकडे स्वाधीन केली. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविकांत अडुळकर, मारुती साखरे आदी उपस्थित होते. यावेळी जाधव यांनी रिक्षाचालक पवार यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. ज्याची रक्कम आहे; त्यांनी ओळख पटवून पोलीस ठाण्यातून घेऊन जावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले आहे.