कोकणातील प्रयोगशील १०५ शिक्षकांचा गौरवसोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 03:29 PM2019-11-18T15:29:11+5:302019-11-18T15:31:04+5:30
कोकणातील प्रयोगशील व नाविन्यपूर्ण कल्पना राबविणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्याच्या दृष्टीने कार्यक्रम सुरू करण्यात आला, असे निरंजन डावखरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. या कार्यक्रमात डॉ. आर. डी. कुलकर्णी, डॉ. आर. आर. देशमुख यांच्याबरोबरच डॉ. भानुशाली यांनी मानवी जीवनातील शिक्षकांचे महत्व आवर्जून नमूद केले.
ठाणे, दि. १३ (प्रतिनिधी) : कोकणातील पाच जिल्ह्यात सर्जनशील, उपक्रमशील आणि नाविन्यपूर्ण प्रयोग राबवून शिक्षण देणाऱ्या १०५ शिक्षक व संस्थांचा आज गौरव करण्यात आला. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे स्मृतीप्रित्यर्थ ठाण्यात रंगलेल्या पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने कोकणातील शैक्षणिक विश्वातील बुद्धीमंतांचे स्नेहसंमेलनच भरले होते.
कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून भाजपा शिक्षण आघाडी कोकण विभागाच्या वतीने पुरस्कार दिले जात आहेत. यंदा शिक्षकांबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील जीवनगौरव, आदर्श संस्थाचालकांना गौरविण्यात आले. या वेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. आर. डी. कुलकर्णी, आयसीटीचे रजिस्ट्रार प्रा. डॉ. आर. आर. देशमुख, विजय पां. जाधव, भाजपा महिला आघाडीच्या माधवी नाईक, शिक्षणाधिकारी शेषराव बढे, नीलिमा डावखरे, उद्योगपती कृतार्थ राजा, सचिन मोरे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात पद्यश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष बी. डी. काळे यांना वसंत स्मृती जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर वसंत स्मृती आदर्श शिक्षण संस्थाचालक म्हणून कळवा येथील सहकार विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एच. एस. भानुशाली, ठाणे येथील महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सदाशिव देवकर, मोहने येथील त्रिदल एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार प्रा. बी. एन. पाटील यांना गौरविण्यात आले. त्याचबरोबर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०१ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
कोकणातील प्रयोगशील व नाविन्यपूर्ण कल्पना राबविणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्याच्या दृष्टीने कार्यक्रम सुरू करण्यात आला, असे निरंजन डावखरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. या कार्यक्रमात डॉ. आर. डी. कुलकर्णी, डॉ. आर. आर. देशमुख यांच्याबरोबरच डॉ. भानुशाली यांनी मानवी जीवनातील शिक्षकांचे महत्व आवर्जून नमूद केले. या कार्यक्रमानंतर पुरस्कारप्राप्त कोकणातील शिक्षकांचे कुटुंबियांसह स्नेहसंमेलन रंगले. आपल्या शाळेत राबविलेल्या प्रयोगांबाबत शिक्षकांनी चर्चा केली.
या कार्यक्रमात ठाण्यात क्रिकेटपटू घडविणारे शशिकांत नाईक, थायलंडमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत पदके मिळविणाऱ्या ठाण्यातील स्टारफिश अकादमीच्या जलतरणपटूंचा सन्मान करण्यात आला. या पुरस्कार कार्यक्रमाचे नियोजन एन. एम. भामरे, शब्बीर शेख आणि विकास पाटील यांनी केले होते.
विधानपरिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतीय जनता पार्टी, शिक्षक आघाडीतर्फे पुरस्कारप्राप्त मान्यवरांसोबत आमदार निरंजन डावखरे व अन्य.