खारफुटीच्या जंगलात खेकडा प्रकल्पाची आशा

By admin | Published: August 18, 2015 10:59 PM2015-08-18T22:59:22+5:302015-08-18T22:59:22+5:30

बाणकोट ते दाभोळ : खेकडा संवर्धनातून मिळणार रोजगाराच्या संधी

Hope of Crab project in the mangrove forest | खारफुटीच्या जंगलात खेकडा प्रकल्पाची आशा

खारफुटीच्या जंगलात खेकडा प्रकल्पाची आशा

Next

शिवाजी गोरे -दापोली  समुद्र किनाऱ्यावरील खारफुटी निसर्गाचे वरदान असून, खारफुटीमुळे समुद्राचे आक्रमण रोखले जाऊन अनेक जीवजंतूंच्या उत्पत्तीत वाढ होते. अलिकडच्या काळात काही ठिकाणी समुद्राच्या पाण्याने अतिक्रमण केले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणची भातशेती नष्ट होऊन खारफुटीची जंगले वाढली आहेत. अशा जंगलांचा वापर करुन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले असून, बाणकोट ते दाभोळ १०० किलोमीटरच्या गावात ठिकठिकाणी खेकडा संवर्धन प्रकल्प राबवून खारफुटीच्या संवर्धनाबरोबरच खेकडा प्रकल्प मार्गी लागणार आहे.भारत सरकारच्या कांदळवन विभागामार्फत वन विभागाच्या देखरेखीखाली हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. दाभोळ ते बाणकोट दरम्यानच्या ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन चिखलातील खेकडा संवर्धन, खारफुटीतील मधुमखी पालन, समुद्र वनस्पती प्रकल्प राबवण्यात येणार असून, या प्रकल्पातून येत्या पाच वर्षात ५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सुरुवातीच्या काळात सरकारी जागेत हा पायलट प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. स्थानिकांना या प्रकल्पाद्वारे ट्रेनिंग, मार्गदर्शन शिबिर, प्रात्यक्षिके देण्यात येणार आहेत. भारतामध्ये साबण व टुथपेस्ट बनवणाऱ्या काही कंपन्या वनस्पतीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. अशा प्रकारची वनस्पती समुद्र किनाऱ्यावरील खारफुटीच्या जंगलात आढळून येते. समुद्र वनस्पतीचा वापर अनेक कंपन्या करु लागल्या आहेत. काही गावांमध्ये परसबाग उद्ध्वस्त होऊन त्या ठिकाणी खारफुटीने जागा घेतली आहे. मात्र, खारफुटी तोडण्यास बंदी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्याचे होणारे नुकसान लक्षात घेता त्या शेतकऱ्याना पर्यायी उद्योग उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. खारफुटीचे संवर्धन व पर्यायी शेती हा उपाय शेतकऱ्यापुढे राहिल्यास शेतकऱ्याला खारफुटीच्या जंगलातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. स्थानिकांच्या रोजगाराचा व पर्यावरण रक्षणाचा विचार करुन समुद्र किनाऱ्यावरील गावात खेकडा, मधुमखी पालन प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. याकरिता बाणकोट, केळशी, आंजर्ले, दाभोळ, आडे, उटंबर या गावातील ग्रामसभांना भेट देऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. दाभोळ ते बाणकोट या गावातील समुद्र किनाऱ्यावरील गावातील ग्रामस्थांचे शंकासमाधान करण्यात येत असून, आंजर्ले, केळशी, वेळास, बाण्कोट, वेसवी या गावांतील ग्रामसभेत या प्रकल्पाबद्दल माहिती देण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा प्रकल्प अधिकाऱ्याने दिले असून ग्रामसभेत या प्रकल्पाबद्दल एकमत होऊन स्थानिकांनी संपूर्ण सहकार्य करण्याचा ठरावसुद्धा ग्रामसभेत केला. आंजर्ले ग्रामसभेत ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देऊन ग्रामस्थांचे समाधान करण्यात आले. खेकडा प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार मिळणार असून, ६०० ते १५०० ग्रॅम वजन सहा ते आठ महिन्यात होते. याची किंमत सुमारे १ हजार ते १२०० रुपये असणार आहे. या प्रकल्पातून महिला बचतगट, तरुण, सुशिक्षित बेकार स्त्री, पुरुष यांना रोजगार मिळणार आहे.


शेतकऱ्याच्या खासगी शेतीत खारफुटीने आक्रमण केल्यामुळे शेतीपासून वंचित होण्याची वेळ शेतकऱ्यावर आली होती. खारफुटीने शेती नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. परंतु या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. प्रकल्पामुळे शेतीतसुद्धा हा प्रकल्प राबविण्यास पुढे येतील. भविष्यात स्थानिकांना याचा फायदा होईल.
- राजेश जैन,
प्रगतशील शेतकरी, आंजर्ले

Web Title: Hope of Crab project in the mangrove forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.