अंशकालीन स्त्री परिचर कर्मचाऱ्यांचे घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 03:53 PM2019-06-19T15:53:14+5:302019-06-19T15:54:02+5:30
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा अंशकालीन स्त्री कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. त्यानंतर दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत हेच आंदोलन जिल्हा परिषद कार्यालयासमोर छेडण्यात आले.
ओरोस : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा अंशकालीन स्त्री कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. त्यानंतर दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत हेच आंदोलन जिल्हा परिषद कार्यालयासमोर छेडण्यात आले.
यावेळी अतिरिक्त महासचिव रावजी यादव, परिचर संघटना अध्यक्ष मनीषा परब, सचिव अर्चना महाले, जिल्हा संघटक शितल सावंत यांच्यासह असंख्य कर्मचारी उपस्थित होते.
४० रुपयांत येते काय, चहा, नाष्टा काहीच नाय, सरकार खाते तुपाशी, आम्ही राहिलो उपाशी, एक रुपयाचा कढीपत्ता, सरकार झाले बेपत्ता, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही अशा घोषणा देण्यात आल्या.
विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर तसेच जिल्हा परिषद गेटसमोर महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी संघटनेने अतिरिक्त महासचिव रावजी यादव व अध्यक्षा उषा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली घंटानाद आंदोलन केले. तर ३ जुलै रोजी आझाद मैदान, मुंंबई येथे बेमुदत उपोषण केले जाणार आहे, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने ६ मे रोजी दिलेल्या निवेदनातील मागण्यांची कोणतीही कार्यवाही झालेली नसून फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. अनेकवेळा स्त्री परिचर यांना शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे कोणताही लाभ मिळत नाही.
जिल्हा परिषद सेवेचा राजीनामा दिल्यानंतरही पुन्हा जिल्हा परिषद सेवेत दिलेल्या नियुक्तीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, आरक्षण नसेल तर जाब मागायला कोणाकडे जावे, यापुढे आमची दखल न घेतल्यास आगामी होणाऱ्या शासन अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून मुंबईत आझाद मैदान येथे उपोषण केले जाणार आहे, असा इशारा रावजी यादव यांनी दिला.