सभा अनिश्चित काळासाठी तहकूब

By admin | Published: December 3, 2015 11:17 PM2015-12-03T23:17:35+5:302015-12-03T23:54:10+5:30

वैभववाडी पंचायत समिती : वादग्रस्त ग्रामसेवकांच्या कारवाईसाठी कामकाज रोखले, अधिकारी ताटकळले

House adjourned for an indefinite period | सभा अनिश्चित काळासाठी तहकूब

सभा अनिश्चित काळासाठी तहकूब

Next

वैभववाडी : अकार्यक्षम आणि भ्रष्टाचाराचा ठपका ठेवलेल्या तालुक्यातील तीन वादग्रस्त ग्रामसेवकांवर गेल्या वर्षभरापासून कारवाई केली जात नसल्याने प्रशासनाच्या निषेधार्थ सत्ताधाऱ्यांनी पंचायत समितीचे कामकाज रोखले. त्या तिघांना तालुक्याच्या आस्थापनेवरुन हटविल्याशिवाय सभेचे कामकाज चालू देणार नाही असा आक्रमक पवित्रा सदस्यांनी घेतल्यामुळे सभापती वैशाली रावराणे यांनी सभेचे कामकाज तहकूब केले. त्यानंतर तब्बल तीन तासांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी फॅक्सद्वारे पाठविलेल्या पत्रामुळे पंचायत समिती सदस्य संतापले आणि त्यांनी अनिश्चित काळासाठी सभा तहकूब केली आहे.
सभापती वैशाली रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला उपसभापती शोभा पांचाळ, गटविकास अधिकारी सदानंद पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, सदस्य नासीर काझी, शुभांगी पवार, मंगेश गुरव, बंड्या मांजरेकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, सभापती रावराणे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्याशी संपर्क साधून निर्माण झालेल्या परिस्थितीची कल्पना दिली. त्यामुळे सावंत यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणदिवे यांच्याशी संपर्क साधून वैभववाडीत जाण्यास सांगितले. त्यानुसार रणदिवे यांनी देवगडमधील सभा संपवून या विषयात लक्ष घालतो आणि दोनच दिवसात कारवाई केली जाईल असे पुन्हा भ्रमणध्वनीवर सभापतींना सांगितले. मात्र, सभापतींनी अर्धा तास सभा तहकूब करीत दालन गाठले. त्यानंतर तब्बल तीन तासांनी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सभापतींना फॅक्स आला.
तो फॅक्स पाहून सत्ताधारी अक्षरश: खवळले. त्यांनी तीन तास सभागृहात ताठकळत बसलेल्या अधिकाऱ्यांना सभा अनिश्चित काळासाठी तहकूब केल्याचे जाहीर करुन मोकळे केले.
अनिश्चित काळासाठी सभा तहकूब करण्याचा हा जिल्ह्यातील बहुधा पहिलाच प्रकार आहे. जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन यांच्यातील अंतर्गत वादामुळे म्हणा किंवा प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील अंतर्गत वादाचा फटका अशाप्रकारामुळे विकासकामांवर बसणार
आहे. (प्रतिनिधी)


नासीर काझी यांचा आक्रमक पवित्रा : मागील सभेचे इतिवृत्त वाचन झाल्यावर
सदस्य नासीर काझी यांनी वादग्रस्त ग्रामसेवकांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करून सभेचे कामकाज रोखले. त्यामुळे सभापती रावराणे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. बी. रणदिवे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. मात्र, रणदिवे यांनी दोन दिवसात कारवाई करतो असे सांगितले. त्यावेळी सभापतींनी काझी यांच्याशी बोलण्यास सांगितले. त्यानुसार काझी रणदिवे यांचे संभाषण झाले. त्यावेळी आमचा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही. त्या तिघांना आमच्या तालुक्यातून बाहेर घेऊन जा आणि हवेतर त्यांना बढती द्या, अशा शब्दात संताप व्यक्त करीत जोपर्यंत तीन ग्रामसेवकांना आस्थापनेवरुन हटविले जात नाही तोपर्यंत कामकाज सुरू करणार नाही असे काझी यांनी रणदिवे यांना ठणकावले.


कारवाईला अवधी लागणार!
दुपारी साडेतीनच्या सुमारास ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र फॅक्सद्वारे सभापतींना प्राप्त झाले. त्यामध्ये म्हटले आहे की, वैभववाडी पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक दत्तात्रय कांबळे, शहाजी कस्तुरे आणि डी. एम. सावंत यांच्यावर प्रशासकीय कारवाईसाठी परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त करून घेतला असून कारवाई प्रस्तावित आहे. तथापि कारवाई करण्यास अवधी लागणार आहे, असे नमूद असल्यामुळे पदाधिकारी संतापले आहेत.


अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार
पंचायत समितीचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केल्यानंतर सभापतींच्या दालनात पंचायत समिती पदाधिकारी पत्रकारांशी बोलतात यामागची कारणे स्पष्ट केली.
ते म्हणाले, गेले दीड वर्ष या तीन ग्रामसेवकांचा मुद्दा सभागृहात सातत्याने चर्चिला जात आहे. त्यानुसार वारंवार वरिष्ठांशी संपर्क साधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
परंतु उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आजच्या सभेतील दूरध्वनी संभाषणाचा संदर्भ देऊन सभापतींना पाठविलेले पत्र हा सभागृहाचा अवमान आहे.
त्यामुळे आमदार नीतेश राणे यांच्या निदर्शनास आणून देत तीन ग्रामसेवकांना कोण पाठीशी घालतोय त्या अधिकाऱ्यावरच करवाईची मागणी करणार आहोत.

ठरावांना काय किंमत? : नासीर काझी
भ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम ग्रामसेवकांवर कारवाई करुन त्यांना वैभववाडीच्या आस्थापनेवरुन हटविण्यासाठी आम्ही सभागृहात ठरावांद्वारे सातत्याने मागणी करीत आहोत. पाचवेळा मुख्यकार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठविण्यात आले आहे. परंतु उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्राचा विचार करता सभागृहात होणाऱ्या ठरावांना किंमत काय ? असा प्रश्न आमच्याच मनात निर्माण होऊ लागला आहे. अशी खंत नासीर काझी यांनी व्यक्त केली.

Web Title: House adjourned for an indefinite period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.