कुडाळमध्ये भट्टीच्या स्फोटात घर उद्ध्वस्त
By admin | Published: May 18, 2015 11:50 PM2015-05-18T23:50:20+5:302015-05-19T00:21:28+5:30
आजूबाजूच्या घरांचेही नुकसान : घराचे पत्रे ४० फुटांपर्यंत उडाले
कुडाळ : कुडाळ-तळेवाडी येथील सुमारे १० वर्षे बंद अवस्थेत असलेल्या लाडू, फरसाण बनविण्याच्या भट्टीमध्ये झालेल्या स्फोटाच्या आवाजाने कुडाळ शहरातील सुमारे तीन ते चार किलोमीटरचा परिसर हादरला. स्फोट कशाचा झाला, हे पाहण्यासाठी तुपटवाडीच्या शेजारीच असलेल्या तळेवाडी येथे कुडाळातील नागरिकांनी गर्दी केली.
कुडाळ-तुपटवाडी शेजारीच तळेवाडी असून याठिकाणी भोगटे कुटुंबीयांचे घर आहे. याच घराच्या बाजूला भोगटे कुटुंबीयांची फरसाण, लाडू तसेच इतर पदार्थ बनविण्याची भट्टी होती. मात्र, गेली दहा वर्षे ती बंद अवस्थेत आहे. या भट्टीत सोमवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास जोरदार स्फोट झाला आणि भट्टी असलेल्या घराचे पत्रे सुमारे ३० ते ४० फुटांपर्यंत उडाले.
स्फोटाची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी जात स्फोट कशामुळे झाला, याची पाहणी केली. मात्र, स्फोट नेमका कशामुळे घडला, याचे नेमके कारण पोलीस तसेच ग्रामस्थांना समजू शकले नाही. (प्रतिनिधी)
नागरिकांमध्ये घबराट
या स्फोटाचा आवाज कुडाळ शहराच्या तीन ते चार किलोमीटरच्या परिसरात घुमला. कसला आवाज झाला, हे कोणालाच न समजल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. या स्फोटामुळे छपराचा लोखंडी बार वाकला. सिमेंटच्या पत्र्यांचा चक्काचूर होऊन त्यांच्या ठिकऱ्या ३० ते ४० फूट उंच उडाल्या.
आजूबाजूच्या काही घरांच्या खिडक्यांच्या काचांना तडे गेले. भट्टी असलेल्या चिऱ्याच्या भिंती पडल्या. भट्टीची चिमणी नेस्तनाबूत झाली आणि परिसरात पत्र्यांच्या तुकड्यांचा सडा पडला होता. स्फोटामुळे उंच उडालेले पत्र्यांचे काही तुकडे बाजूलाच असलेल्या कणकीच्या बेटात जाऊन अडकले होते.