सोनुर्ली गावात क्रशरमुळे घर, बागायतींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 11:59 AM2019-01-25T11:59:35+5:302019-01-25T12:00:44+5:30
सोनुर्ली गावात असणाऱ्या क्रशरमुळे शेतकऱ्यांच्या बागायती आणि घरांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. घरांना भेगा गेल्याने प्रचंड नाराजी आहे. जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सावंतवाडी : सोनुर्ली गावात असणाऱ्या क्रशरमुळे शेतकऱ्यांच्या बागायती आणि घरांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. घरांना भेगा गेल्याने प्रचंड नाराजी आहे. जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सोनुर्ली गावातील क्रशरमुळे उडणारी पावडर काजू व आंबा बागायतींमध्ये घुसल्याने आलेला मोहोर पांढरा होऊन गळून पडत आहे. त्यामुळे काजू व आंबा बागायतींचे प्रचंड नुकसान झाल्याचे प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तसेच दगड फोडण्यासाठी जे सुरुंग लावले जातात. त्यामुळे सोनुर्ली गावातील घरांच्या भिंतींना हादरे बसत आहेत. घरांना भेगा पडल्याने घरे पडण्याच्या स्थितीमुळे जीविताला हानी होण्याची भीती आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेण्यात येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
क्रशर व दगडखाणींमुळे बागायती आणि घरांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे तसेच क्रशरचा परवाना त्वरित रद्द करावा आणि नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल, असे या निवेदनामध्ये डॉ. अमृता अजय स्वार, गौरप्रीया अतुल पैकाणे, गोपाळ कृष्णा गावकर, रामचंद्र धोंडू गावकर, जयराम बापू गावकर, गोविंद मुकुंद परब, अजित दत्ताराम महाडिक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.