घरोघरी आता व्हॉट्सअ‍ॅप बाप्पा

By admin | Published: September 3, 2016 09:07 PM2016-09-03T21:07:45+5:302016-09-03T21:07:45+5:30

चांगल्या आणि वाईट गोष्टी सर्वांसमोर बेधडक मांडण्यासाठी खासकरून तरुणाई सोशल मीडियाचा वापर करत आहे.

The house is nowWhatsapp Bappa | घरोघरी आता व्हॉट्सअ‍ॅप बाप्पा

घरोघरी आता व्हॉट्सअ‍ॅप बाप्पा

Next

सिंधुदुर्गातील प्रत्येक कुटुंबात मोठ्या भक्तिभावाने उद्यापासून दीड, पाच, सात, अकरा, एकवीस दिवस गणेशोत्सव साजरा होईल. ज्याप्रमाणे नव्या वर्षाची सुरुवात प्रत्येकजण नव्या आशा, नवी संकल्पना घेऊन करतो, तसाच प्रकार सिंधुदुर्गातील गणेशोत्सवाबाबत आहे. प्रत्येक कुटुंब या उत्सवाच्यानिमित्ताने किमान अकरा दिवस आपआपसातील भांडणे, भेदभाव बाजूला ठेवून (उत्सवाच्यानिमित्ताने का असेल) एकत्र नांदते. एरवी प्रत्येकजण आपआपल्या कामात मग्न असतो. मात्र, उत्सवाच्यानिमित्ताने सर्व एकत्र येतात आणि त्यातूनच अनेक वर्षानुवर्षांचे वाद मिटण्यासाठी मदत होते. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त सिंधुदुर्गातील वातावरण धार्मिकतेने मंत्रमुग्ध होते.
काळानुरूप गणेशोत्सवाच्या साजरीकरणामध्ये आता मोठे बदल घडत आहेत. कारण गेल्या पाच-सहा वर्षांत सोशल मीडियाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. समाजातील प्रत्येक गोष्टीवर अभिप्राय देण्याचे साधन म्हणून आता व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, ट्यूटरचा मार्ग अवलंबिला जात आहे. पूर्वी गणेशोत्सव म्हटला की, भजनातील किंवा कवी कवितेतून उत्सवाची मांडणी करायचे. आता ती जागा व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकने घेतली आहे. कुठलाही सण असो त्या सणाच्या शुभेच्छा देताना त्या सणाचे महत्त्व, त्या सणातील चांगल्या आणि वाईट गोष्टी सर्वांसमोर बेधडक मांडण्यासाठी खासकरून तरुणाई सोशल मीडियाचा वापर करत आहे.
गणेशोत्सवाची चाहूल देणारे अनेक फोटो किंवा कविता प्रत्येक व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर सध्या खणखणत आहेत. त्यातील एक उदाहरण द्यायचे झाल्यास,
कैलासावर सुरू झाली सामानाची तयारी।
लहानग्या गणपतीची निघणार होती स्वारी।।
पार्वती आली करून हरितालिकेची पूजा।
दूध आणून म्हणाली गणपतीला उठ माझ्या राजा।।
शंकराने गणपतीला गंगेत घातले न्हाऊ।
म्हणाले, ‘गणोबा, तिकडे मोदक खूप नको खाऊ’।।
कार्तिकेयाने दिले त्याला नवे पिवळे पितांबर।
म्हणाला, ‘गणू, दहा दिवस संपवून खेळायला ये लवकर’।।
पार्वतीने दिले प्रवासासाठी लाडू।
म्हणे, ‘उंदरालाही दे, वाटेत नका रे भांडू’।।
या सगळ्यांतच गणपतीला आलं जरा भरून।
पण भक्तांच्या प्रेमापोटी रडू घेतलं आवरून।।
शेवटी शंकराला मिठी दिली पार्वतीला पापा।
आणि माझ्या घरी येतोय माझा गणपती बाप्पा...।।
सिंधुदुर्गातील जनता ही मुंबईतील चाकरमान्यांच्या मनिआॅर्डरवर चालते अशी असणारी स्थिती आता काळानुरूप बदलली आहे. येथील लोकांना इथल्या इथे रोजगार मिळण्यासाठी सर्वचजण आपआपल्या परीने धडपडत आहे. त्यामुळे हळूहळू ही स्थिती आता बदलत चालली आहे. सिंधुदुर्गचा सुपुत्र या ना त्या कारणाने जे आपल्या मूळ गावापासून बाहेर असतात, ते आर्वजून गणेशोत्सवाला येतात. गणेशोत्सवात सिंधुदुर्गात घरोघरी लोक येत असल्याने यात कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे गणेशोत्सवाची पूर्वीची संकल्पना व आता बदललेला उत्सव यात वर्षानुवर्षे बदल होत आहे.
वर्षभर बंद असलेली घरे आता उघडणार असून त्यानिमित्ताने ती पुढील काही दिवस प्रकाशाच्या तेजाने उजळून निघणार आहेत. कोकण रेल्वे, एस. टी. बस किंवा मिळेल त्या खासगी वाहनाने आता चाकरमानी घरोघरी दाखल झाले आहेत. सिंधुदुर्गात गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वार्थाने घरोघरी चालणारी भजन संस्कृती सर्व तंटे मिटविण्यासाठी फार उपयुक्त ठरते. गणेशोत्सवाच्यानिमित्ताने प्रत्येक वाडीचे भजन मंडळ असते. बाकी सर्व गोष्टीत जरी वाद-विवाद असले तरी भजनासाठी सर्वचजण एकत्र येतात. त्यातून काही वेळा वाद मिटण्यासाठी त्याचा उपयोग होतो. दरवर्षी आर्वजून येणाऱ्या चाकरमान्यांची वाट तर सर्वच गाववाले पाहत असतात. पूर्वीच्या काळात चाकरमानी येईल आणि आपल्याला मदत होईल, अशी असणारी भावना आता काही प्रमाणात बदलली आहे. येथे असणारे गाववालेच चाकरमान्यांना तो पुन्हा मुंबईला परतीच्या वाटेकडे निघताना मदत करायला सुुरुवात झाली आहे. कारण सध्याच्या महागाईतील मुंबईतील जीणं त्यांना पेलवतच नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा न धरताच गाववाले आता चाकरमान्यांनाच मदत करायला लागलेत. बदललेल्या ट्रेंडबाबतचा ऊहापोह आपल्याला व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून अनुभवायला मिळत आहे.


बेधडक --महेश सरनाईक

Web Title: The house is nowWhatsapp Bappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.