आदित्य ठाकरेंनी कोकणसाठी किती निधी दिला?, नितेश राणेंचा सवाल
By सुधीर राणे | Published: September 26, 2023 11:47 AM2023-09-26T11:47:37+5:302023-09-26T11:48:12+5:30
कणकवली: सिंधुदुर्ग , रत्नागिरी, रायगडमध्ये येऊन पर्यटनाला चालना देण्यासाठी वेगळी ताकद लागते. मात्र, फुकटच्या बडबडण्याला कोकणची जनता महत्त्व देत ...
कणकवली: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये येऊन पर्यटनाला चालना देण्यासाठी वेगळी ताकद लागते. मात्र, फुकटच्या बडबडण्याला कोकणची जनता महत्त्व देत नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी सत्ता असताना कोकणसाठी किती निधी दिला ते प्रथम सांगावे? असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला.
कणकवली येथे आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांचे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी विधिमंडळामध्ये जाहीर केले होते की कोकणामध्ये जे नियमित कर्ज भरतात त्या प्रत्येकाला ५० हजार रुपयांचे कर्ज दिले जाईल. पण त्यांच्या अडीच वर्षांच्या कारकीर्दीमध्ये ते पन्नास हजार सोडाच पण एक दमडी पण भेटलेली नाही. सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेल्या शिव मंदिराला ५० लाख रुपये स्वतः पदरमोड करून देणार असेही उद्धव ठाकरे यांनी घोषित केले होते. मग आदित्य ठाकरेंनी त्यांच्या वडिलांनी जाहीर केलेल्या पैकी एक तरी काम पूर्ण केले आहे काय? याबाबत जनतेला सांगावे.
शिंदे आणि फडणवीस सरकारने ठाकरेंनी जाहीर केलेले ५० हजार रुपये शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा व पर्यटकांसारखे इथे येण्यापेक्षा त्यांचे वडिल अडीच वर्षांमध्ये सरकारमध्ये असताना तसेच ते स्वतः पर्यटन मंत्री असताना किती वेळा कोकणात आले ते सांगावे. गोव्यामध्ये येऊन फाईव्ह स्टारमध्ये नाईट लाईफ करणे सोपे आहे. पण सिंधुदुर्गसह कोकणात येऊन पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणे फार कठीण आहे.
या कोकणात वादळ आले तेव्हा एक दमडी पण ठाकरे सरकारने दिली नाही. निसर्ग वादळाच्या वेळी ७५ लाख सिंधुदुर्गाला मिळणार होते. त्याचे काय झाले? एक रुपया देखील मिळालेला नाही. त्यामुळे पुढच्या वेळी आदित्य ठाकरे सिंधुदुर्गात आले तर त्यांनी खुल्या व्यासपीठावर यावे. मी पण त्यावेळी येईन. आपण कोकणाच्या विकासावर चर्चा कर. कोकणच्या जनतेला सत्य काय आहे ते समजूदेत असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.