बेकायदा मद्य रोखणार कसे?
By admin | Published: January 9, 2016 12:03 AM2016-01-09T00:03:19+5:302016-01-09T00:36:02+5:30
रत्नागिरी : उत्पादन शुल्क विभागाकडील पन्नास टक्के पदे रिक्तच...
प्रकाश वराडकर -- रत्नागिरी बेकायदा मद्य वाहतूक रोखण्याचे मोठे आव्हान उत्पादन शुल्क विभागापुढे आहे. मात्र, रत्नागिरी जिल्हा उत्पादन शुल्क विभागात मंजूर पदांपैकी निम्मी पदे बऱ्याच काळापासून रिक्त आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ६५ ते ७० टक्केपर्यंत पदे रिक्त आहेत. त्यामुळे महामार्गावरून व अन्य मार्गावरून होणाऱ्या बेकायदा मद्य वाहतुकीला रोखण्याचे मोठे आव्हान या अपुऱ्या यंत्रणेवर आहे.
रत्नागिरी जिल्हा उत्पादन शुल्क विभागात गेल्या काही वर्षांपासून कर्मचारी संख्या कमी आहे. सध्या या विभागात एक उपविभागीय पोलीस अधिकारीपद रिक्त आहे. निरीक्षकांची सहा पदे मंजूर असून, त्यातील चार पदे अद्याप रिक्त आहेत. केवळ दोन निरीक्षकांना अतिरिक्त काम पाहावे लागत आहे. उपनिरीक्षकांची १३ पदे मंजूर असून, त्यातील ८ पदे रिक्त आहेत. ५ उपनिरीक्षक कार्यरत आहेत. कॉन्स्टेबल्सची ५० टक्केपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. १९ पदे मंजूर असून, केवळ ८ पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. ११ पदे रिक्त आहेत. वाहनचालकांच्या ७ मंजूर पदांपैकी ३ पदे रिक्त आहेत. ४ वाहनचालक उपलब्ध आहेत. ८ मंजूर लिपिकांपैकी केवळ ३ कार्यरत आहेत. ५ पदे रिक्त आहेत. कार्यालय अधीक्षक, लेखापाल व लघुटंकलेखकाचे प्रत्येकी १ पद रिक्त आहे. मंजूर दोन वरिष्ठ लिपिकांमधील एक पद रिक्त आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उत्पादन शुल्क विभागाकडे मंजूर पदांपैकी केवळ ३० टक्के कर्मचारीच उपलब्ध आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई - गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर बेकायदा मद्याची वाहतूक होत असल्याचे रत्नागिरी विभागाने केलेल्या धडक कारवाईत उघड झाले आहे. त्याशिवाय गावठी दारुच्या भट्ट्याही या विभागाने गेल्या दोन वर्षांच्या काळात वारंवार उध्वस्त केल्या आहेत. अनेकांवर कारवाई केली आहे.
बेकायदा मद्याची वाहतूक रोखण्यात अपुरे कर्मचारी असतानाही रत्नागिरी विभागाने चांगली कामगिरी केली आहे. या विभागातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरली गेल्यास महामार्गावरील बेकायदा मद्य वाहतुकीचे जाळे उद्ध्वस्त करणे शक्य होईल व शासनाच्या महसुलातही वाढ होईल. त्यामुळे रिक्त पदे भरून उत्पादन शुल्क विभाग अधिक सक्षम करण्याची मागणी होत आहे.
सिंधुदुर्ग : सत्तर टक्के पदे रिक्त असल्याने कारवाई ठप्प...
रत्नागिरी जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर अधीक्षक संतोष झगडे यांनी महामार्गावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे गोवा व अन्य ठिकाणाहून छुप्या पध्दतीने होणाऱ्या गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक रोखण्यात रत्नागिरी विभागाला गेल्या दोन वर्षात मोठे यश प्राप्त झाले आहे. केवळ महामार्गावरच नव्हे; तर कोकण रेल्वेच्या रो रो सेवेद्वारे जाणाऱ्या वाहनांमध्येही बेकायदा मद्याची वाहतूक पकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अशी बेकायदा वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या पार्श्वभूमीवर अधिक कारवाई होण्यासाठी रत्नागिरी विभागातील रिक्त पदे भरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.