कॉफी टेबल बुकवर ३२ लाख खर्च कसे पडले ?
By admin | Published: August 26, 2015 11:31 PM2015-08-26T23:31:35+5:302015-08-26T23:31:35+5:30
परशुराम उपरकर यांचा सवाल : कोणतीही निविदा प्रक्रिया झाली नसल्याचा दावा
सावंतवाडी : शासनाच्यावतीने सिंधुदुर्गमध्ये घेण्यात आलेला पर्यटन महोत्सव वादात सापडला असून, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पर्यटन महोत्सवात वाटलेल्या कॉफी टेबल बुकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत या पुस्तकावर कोणतीही निविदा न काढता ३२ लाख रुपये कसे खर्च करण्यात आले याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पूर्वीचा विरोधी पक्ष जसा आंदोलन करीत होता, तशीच आंदोलने आताचा विरोधी पक्ष करीत आहे. चेहरे फक्त बदलेले आहेत, अशी जोरदार टीका सत्ताधारी व विरोधकांवर केली.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष गुरू गवंडे, उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर, रमाकांत सावंत, आदी उपस्थित होते. माजी आमदार उपरकर म्हणाले, मागच्या काळात आताचे सत्ताधारी डॉक्टर तसेच रस्त्यावरील खड्डे यासाठी सतत उपोषण आंदोलन करीत असत. पण, ही परिस्थिती काही बदलली नसून आताचे विरोधी पक्षही तेच करीत आहेत. चेहरे बदलले, पण समस्या त्याच आहेत. यावर मार्ग काढणारे कोण नाहीत. पालकमंत्र्यांचा धाकच राहिला नाही. अधिकारी पालकमंत्र्यांवर वरचढ झाले आहेत. जिल्ह्यात करण्यात आलेले रस्ते लगेच खराब कसे होतात, अधिकारी व ठेकेदार यांच्यात काही साटेलोटे आहे का, याची चौकशी झाली पाहिजे.
मनसे यावर आवाज उठविणार असून, नवीन शासनाने एक रस्ता पाच वर्षे तरी टिकला पाहिजे, अन्यथा त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणार, असे म्हटले होते. पण, सिंधुदुर्गात हा नियम लावल्यास अनेक ठेकेदार काळ्या यादीत जातील. त्यात जिल्हा परिषद व बांधकाम विभागाचेही यातून सुटणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मालवण येथे आयोजित करण्यात आलेल्या पर्यटन महोत्सवामध्ये कॉफी टेबल बुक वाटण्यात आली. पण, ही पुस्तके छापण्यात आली, त्यांची साधी निविदाही काढण्यात आली नाही.
तसेच या पुस्तकावर खर्च घालण्यात आला तो डोळे दीपवणारा असून, ३२ लाख रुपयांमध्ये पर्यटनाची मोठी वास्तू उभी राहिली असती. मात्र, कॉफी टेबल बुक काढून ते कोणाला बघायलाही मिळाले नाही.
त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करणार असल्याचे माजी आमदार उपरकर यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)
ंसातार्डा सातोसे रस्त्याबाबत सीईआेंना भेटणार
उत्तम स्टील कंपनीने ४ कोटी रुपये जिल्हा परिषदकडे वर्ग केले आहेत. तो रस्ता दर्जेदार करायला हवा होता; पण तो निकृष्ट दर्जाचा बनविण्यात आला आहे. अनेक ठिकाणी साईडपट्ट्याच करण्यात आल्या नसून, धोकादायक वळणे काढण्यात यावीत, यासाठी आम्ही लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग यांची भेट घेणार असल्याचे परशुराम उपरकर यांनी सांगितले.