तरीही गणेशचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार पूर्ण
By admin | Published: August 29, 2014 10:23 PM2014-08-29T22:23:32+5:302014-08-29T23:10:32+5:30
गणेश राठोड : जातीचा दाखला न मिळाल्याने पॉलिटेक्निक प्रवेशापासून वंचित
रत्नागिरी : आई - वडील मोलमजुरी करतात. तरीही दहावीच्या परीक्षेत ८० टक्के गुण मिळवणाऱ्या लमाण समाजातील गणेश मोतीराम राठोड या मुलाला केवळ अनुसूचित जातीचा दाखला न मिळाल्याने यावर्षी त्याला पॉलिटेक्निच्या प्रवेशाला मुकावे लागले. मात्र, येथील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाने शिकण्याची जिद्द आणि त्याची हुशारी पाहून त्याला महाविद्यालयात अकरावीत प्रवेश दिला. आता बारावीनंतर त्याचे इंजिनिअरचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. अन्यथा त्याचे एक वर्ष वाया गेले असते.
गणेशचे वडील मोतीराम राठोड एका अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून नोकरी करतात. मूळ उस्मानाबाद येथील हे कुटुंब गेली २५ वर्षे रत्नागिरीत वास्तव्याला आहे. गणेशाचे वडील निरक्षर असल्याने त्यांच्याकडे कुठलीच कागदपत्र नाहीत. आईही घरकाम करून संसाराला हातभार लावते. तरीही त्यांनी स्वप्न बघितलीत ती आपल्या दोन्ही हुशार मुलांना शिक्षणाने उच्च पदावर न्यायचं. येथील पटवर्धन प्रशालेत शिकत असताना गणेशने यावर्षी दहावीत कुठलीही खासगी शिकवणी नसताना चक्क ८८ टक्के मार्क मिळविले. त्याची लहान बहीण रेणुका नववीत ७८ टक्के मार्क मिळवून आता दहावीत गेलीय.
गणेशला इंजिनिअर होण्याची इच्छा असल्याने त्याने दहावीनंतर पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेला जातीचा दाखला मोतीराम यांना उस्मानाबाद येथून आणावा लागणार होता. प्रवेशाला तर केवळ चार दिवस शिल्लक होते. खुल्या वर्गातून प्रवेश घ्यावा, तर ८००० रूपये शुल्क देण्याचीही त्याची क्षमता नव्हती. त्यामुळे ८० टक्के गुण मिळवूनही गणेशला तंत्रनिकेतनला प्रवेश घेता आला नाही.
गणेशने येथील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयातही अकरावी प्रवेशासाठी अर्ज केला होता. प्रवेशावेळी त्याने आपली अडचण महाविद्यालयाला सांगितली. त्याची शिकण्याची अतीव इच्छा होती. मात्र, त्याआड असलेली जातीच्या दाखल्याची अडचण समजून महाविद्यालयाने दाखला आणण्यासाठी त्याला काही दिवसांची मुदत दिली आणि त्याला अकरावीत प्रवेशही दिला. दरम्यान, त्याच्या वडिलांनी आपल्या गावाला जाऊन जातीचा दाखलाही मिळविला. त्यामुळे प्रवेशाचा अडसर दूर झाला.
वाया जाणारे वर्ष भरून निघाले. आपल्याला इंजिनिअर व्हायचेच आहे. त्यामुळे आपण अभ्यासासाठी खूप कष्ट घेणार, असे मनोगत गणेश व्यक्त करतो. (प्रतिनिधी)