कुडाळ-केळबाईवाडी येथे सापडली मानवी कवटी, हाडे; तपासणीसाठी पुण्याला पाठवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 12:16 PM2023-10-02T12:16:39+5:302023-10-02T12:17:26+5:30
कुडाळ : कुडाळ शहरातील केळबाईवाडी येथे ओहोळाच्या बाजूला मानवी कवटी व हाडे आढळली आहेत. ती कोणाची आहेत आणि त्या ...
कुडाळ : कुडाळ शहरातील केळबाईवाडी येथे ओहोळाच्या बाजूला मानवी कवटी व हाडे आढळली आहेत. ती कोणाची आहेत आणि त्या ठिकाणी ती कशी आली? याचा कुडाळ पोलिस तपास करीत आहेत. या ओहोळानजीक असलेल्या कातकरी समाजाच्या वस्तीमधील बेपत्ता झालेल्या रामा सावळा पवार यांचा तो मृतदेह आहे का? याचीही तपासणी केली जात आहे.
कुडाळ-केळबाईवाडी येथील वामन राऊळ हे केळीची पाने आणण्यासाठी ओहोळाच्या शेजारी असलेल्या जागेत गेले असता, त्यांना तेथे मानवी कवटी व इतर हाडे दिसली. त्यांनी कातकरी समाजाचे अर्जुन पवार यांना ही माहिती दिली. या ओहोळानजीक कातकरी समाजाची वस्ती आहे. या वस्तीमधून जुलै महिन्यामध्ये रामा पवार हे बेपत्ता झाले होते. याबाबत त्यांची बहीण सुरेखा पवार हिने कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिस घटनास्थळी झाले दाखल
कुडाळ-केळबाईवाडी येथे मानवी कवटी व इतर हाडे सापडल्याचे समजताच कुडाळचे पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला, सहायक पोलिस निरीक्षक सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक कराडकर, पोलिस हवालदार देवानंद माने हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या मानवी हाडांची पाहणी करून पंचनामा करून ती ताब्यात घेतली.
मानवी हाडे पाठवणार तपासणीसाठी
ती मानवी हाडे तपासणीसाठी सांगली, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. या तपासणीत हा मृतदेह पुरुष की स्त्रीचा आहे हे तसेच मृत्यू कशामुळे झाला हे समजणार आहे.