दक्षिण वाऱ्यामुळे देवगडात शेकडो नौका स्थिरावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 02:34 PM2020-09-13T14:34:56+5:302020-09-13T14:36:22+5:30
एकीकडे दक्षिण वाऱ्यामुळे मासळी व्यवसायावर परिणाम झाला असताना दुसरीकडे परप्रांतीय नौकांच्या धुमाकुळामुळे स्थानिक मच्छिमार त्रस्त झाले आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सुरक्षित असलेल्या देवगड किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नौकांनी आश्रय घेतला आहे.
देवगड : एकीकडे दक्षिण वाऱ्यामुळे मासळी व्यवसायावर परिणाम झाला असताना दुसरीकडे परप्रांतीय नौकांच्या धुमाकुळामुळे स्थानिक मच्छिमार त्रस्त झाले आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सुरक्षित असलेल्या देवगड किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नौकांनी आश्रय घेतला आहे.
शुक्रवारपासून दक्षिण वाऱ्याला सुरुवात झाल्याने समुद्र खवळला आहे. मच्छिमारी नौका समुद्रातून बंदरात परतल्या आहेत. तर दुसरीकडे समुद्रात परप्रांतीय नौका धुडगूस घालत असून देवगडमधील काही स्थानिक नौकांची जाळी तोडल्याने मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
देवगडमधील शहाजद खान यांच्या नौकेची जाळी तोडल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वादळी वारे व परप्रांतीय नौकांचा धुडगूस यामुळे स्थानिक मच्छिमार त्रस्त झाले आहेत. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार किनारपट्टीवर जोराचे वारे वाहत असून समुद्रही खवळलेला आहे. परिणामी शेकडो नौका देवगड किनारपट्टीनजीक सुरक्षितस्थळी विसावल्या आहेत.