साळगाव परिसरातील शेकडो माड जमीनदोस्त
By admin | Published: December 19, 2014 12:09 AM2014-12-19T00:09:34+5:302014-12-19T00:15:45+5:30
हत्तींकडून नुकसान : शेतकरी हतबल; नुकसानग्रस्तांसाठी उपाययोजना करण्याची मागणी
माणगाव : माणगाव परिसरात हत्तींनी माड बागायती उद्ध्वस्त करण्याचा सपाटाच लावला आहे. काल, बुधवारी रात्रीही साळगाव ढोलकरगाव, तांबळवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे शेकडो माड हत्तींनी उन्मळून टाकले. या प्रकारामुळे शेतकरी हैराण झाले असून, यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नानेली परिसरात शेतकऱ्यांच्या नुकसानीनंतर हत्तींनी साळगाव परिसरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी साळगाव ढोलकरगाव, तांबळवाडी परिसरातील तुकाराम मळीक, सत्यवान सावंत, मधुकर सावंत, सुधाकर परब, मुकुंद परब, न्हानू दळवी, तुकाराम परब, रघुनाथ परब, विजय सावंत, धोंडिबा परब, प्रकाश केसरकर, आबा बांदेलकर, तुकाराम भिसे, कृष्णा उमळकर, गुंडू सावंत अशा पंधरा शेतकऱ्यांचे शेकडो माड जमीनदोस्त करीत एक नवा उच्चांक गाठला आहे.
माणगाव वनविभागाचे वनक्षेत्रपाल आर. बी. सानप यांनी आज, गुरुवारी एका दिवसात ५७ माडांचे पंचनामे केले आहेत. हत्तींकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पंचनाम्याकरिता आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. हत्तींच्या या कळपाने माड खाण्यापेक्षा माड पाडण्याचा सपाटा लावला आहे. हत्तींकडून शेतकऱ्यांच्या माडबागायतीत घुसून माड पाडले जात आहेत.
शेतकरी दहा ते वीस वर्षे माडाची जोपासना करीत असून, त्यानंतर नारळ मिळण्याच्या वेळीच हत्तींनी माड पाडून टाकल्याने लाखोंचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला असून, हत्तींच्या बंदोबस्ताची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.
नुकसानभरपाई देण्यास
केंद्राचा हिरवा कंदील
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तींपासून झालेल्या नुकसानीला आता केंद्राची मदत देण्यास केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी हिरवा कंदील दिला आहे. यासाठी येथील खासदार विनायक राऊत यांनी प्रयत्न केले आहेत.
केंद्राकडून मदत मिळावी यासाठी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीत यासंदर्भात विशेष बैठक आयोजित केली व यासंदर्भात विशेष आर्थिक मदतीला मंजुरी देत असल्याचे जाहीर केले.
या बैठकीला खासदार विनायक राऊत, वनविभागाचे डायरेक्टर जनरल एस. एस. गर्बीयार, प्रोजेक्ट एलिफन्टचे इन्स्पेक्टर जनरल आर. के. श्रीवास्तव यांच्यासह पर्यावरण व वनखात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)