वेंगुर्लेत मुसळधार पावसासह चक्रीवादळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 06:38 PM2019-07-12T18:38:18+5:302019-07-12T18:39:22+5:30
तालुक्यातील सर्व नाल्याना मोठ्या प्रमाणात पाणी येऊन नजीकच्या बागायतीत शिरले होते. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यात बुधवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाबरोबरच केळूस, वेतोरे व वजराट येथे झालेल्या चक्रीवादळामुळे घरांची व झाडे मोडून लाखो रुपयांची हानी झाली. बुधवारी रात्री १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या चक्रीवादळाने केळूस-कुडासेवाडी हादरली. या भागात वीज पुरवठा खंडित होण्याबरोबर चक्रीवादळाने घरांची छपरे उडून जात झाडेही मोडून पडली. तसेच तालुक्यातील सर्व नाल्याना मोठ्या प्रमाणात पाणी येऊन नजीकच्या बागायतीत शिरले होते. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
केळूस-कुडासेवाडी ते डिमवाडीपर्यंतच्या सुमारे अडीच किलोमीटर परिसराला बुधवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळाचा तडाखा बसला. डिमवाडी येथील तुळाजी वसंत तांडेल, आनंद शिवराम तांडेल, सिताबाई सहदेव तांडेल, बापू गुंडू आसोलकर, झिलू पुंडलिक तांडेल, सविता सतीश तांडेल यांच्या घरांचे तर दीप स्वानंद प्रभू, तुळाजी वसंत तांडेल व सिताबाई सहदेव तांडेल यांच्या मांगराचे छप्पर उडून गेल्याने नुकसान झाले. तसेच तेथीलच आंबा, काजू, माड, पोफळी व केळीची झाडे मोडून सुमारे ३० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज स्थानिकांनी वर्तविला आहे.
या घटनेची माहिती केळूस तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष योगेश शेटये यांनी पोलीस स्टेशन व आपत्ती कार्यालयात देऊन ते ग्रामस्थांच्या मदतीसाठी गेले. केळूस-कुडासेवाडी येथील भद्रसेन साटम यांच्या घराच्या छपराचे पत्रे उडून गेल्याने स्वयंपाकघरासह अन्य खोल्यांमध्ये पाणी गेले. त्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. या नुकसानीची माहिती मिळल्यानंतर स्थानिक तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, पंचायत समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांनी भेटी देऊन पहाणी केली.
वेतोरे गावात बुधवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या चक्रीवादळामुळे गजानन बाबली सावंत, विश्राम अनंत सावंत, लक्ष्मण अनंत सावंत यांच्या घराचे नुकसान झाले आहे. तर वजराट येथील दोन घरांच्या छपरावरील कौले तर एका घरावरील पत्रे उडून जाऊन नुकसान झाले आहे. दाभोली शाळा नं. १ वर झाड मोडून पडल्याने छपराचे सुमारे ४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मातोंड-मिरमेवाडी येथील सुवर्णा शरद मातोंडकर यांच्या घरावर गुरुवारी दुपारी झाड पडून घराचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मातोंड येथे चिरेखाणीनजीक रस्त्यावर झाडे पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती. येथील सातेरी युवक कला-क्रीडा मंडळाच्या युवकांनी व ग्रामस्थांनी रस्त्यावरील झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. उभादांडा-नवाबाग येथील कौशिक लक्ष्मण मारेजे व रेडी-सुकळभाटवाडी येथील हरिश्चंद्र मामलेकर यांच्या घरावर माड पडून नुकसान झाले.
आडेली गावात प्रकाश जयदेव होडावडेकर, रुक्मिणी कुडाळकर, जनार्दन कुडाळकर, भास्कराचार्य कुडाळकर याच्या घरांचे झाड पडून नुकसान झाले आहे. झाडे मोडून पथदीपांवर पडल्याने विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे. आडेली मुख्य मार्गावर अनेक झाडे पडल्याने वेंगुर्ला-सावंतवाडी-मठमार्गे रस्ता बंद झाला. गुरुवार दुपारनंतर रामघाट रस्त्यावर सागाचे झाड पडल्याने वेंगुर्ला-तुळस-सावंतवाडी रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली.
केळूस-डिमवाडी येथील घराचे वादळी वाºयाने छप्पर उडून गेले.