चक्रीवादळाने वैभववाडीचे जनजीवन विस्कळीत, शेकडो घरांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 08:27 PM2018-10-02T20:27:17+5:302018-10-02T20:27:47+5:30
तालुक्यात दुपारनंतर आलेल्या चक्रीवादळाने दाणादाण उडवून दिली. कोकिसरे नाधवडेसह अनेक गावांतील घरांवर झाडे कोसळून मोठे नुकसान झाले आहे.
वैभववाडी : तालुक्यात दुपारनंतर आलेल्या चक्रीवादळाने दाणादाण उडवून दिली. कोकिसरे नाधवडेसह अनेक गावांतील घरांवर झाडे कोसळून मोठे नुकसान झाले आहे. तर, तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग सायंकाळी चारपासून ठप्प असून बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने झाडे हटविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत महामार्ग खुला होण्याची शक्यता धुसर होती. त्यामुळे संपुर्ण फोंडामार्गे वळविण्यात आली.
दरम्यान, अनेक गावातील वीजवाहिन्या तुटल्या असून वीजेचे खांब मोडून पडल्याने जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले आहे. मंगळवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास विजांच्या प्रचंड कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्याचवेळी झालेल्या चक्रीवादळाने वाभवे, नारकरवाडी, कोकिसरे, नाधवडे, सोनाळी नापणे परिसराला तडाखा दिला. त्यामुळे या परिसरातील जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले.
तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर नाधवडे ते कोकिसरे नारकरवाडी दरम्यान जुनाट वटवृक्षासह शेकडो झाडे कोसळली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तसेच सोनाळी फाट्यानजीक आणि वाभवे बाणेवाडीनजिक झाडे कोसळून मार्ग बंद झाला होता. यापैकी बाणेवाडी येथील झाडे हटवून मार्ग वाहतुकीस खुला केला. त्यामुळेच वैभववाडी तळेरे मार्गावर सुमारे दोन तास अडकून पडलेली वाहने फोंडामार्गे वळविण्यात आली.
शेकडो झाडे कोसळली
कोकिसरे नारकरवाडीपासून नाधवडेपर्यंत शेकडो झाडे कोसळली. त्यामध्ये काही उन्मळून तर बहुतांश झाडे मोडून पडली. नारकरवाडीच्या मोठ्या वळणावरील आंब्याचे मोठे झाड मोडून रस्त्यावर कोसळले. तेथून पुढे फाटकापर्यंतचा संपूर्ण रस्त्यावर झाडेच होती. त्यामुळे पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील झाडे हटविण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरु होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग खुला होण्याची शक्यता धुसर होती. अनेक घरांवर झाडे कोसळून लाखोची हानी झाली असून तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला.