पत्नीच्या छळप्रकरणी पतीला अटक, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 11:08 AM2019-11-13T11:08:17+5:302019-11-13T11:10:11+5:30
पहिले लग्न झालेले असताना त्याची जाणीव न करून देता दुसरे लग्न करून त्या पत्नीचा छळ करणाऱ्या कुडाळ तालुक्यातील पुळास येथील संभाजी रामा निकम (४७) याला कुडाळ पोलिसांनी अटक केली असून, मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. याबाबतची तक्रार त्याची दुसरी पत्नी स्वरूपा संभाजी निकम हिने कुडाळ पोलीस ठाण्यात दिली आहे.
कुडाळ : पहिले लग्न झालेले असताना त्याची जाणीव न करून देता दुसरे लग्न करून त्या पत्नीचा छळ करणाऱ्या कुडाळ तालुक्यातील पुळास येथील संभाजी रामा निकम (४७) याला कुडाळ पोलिसांनी अटक केली असून, मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. याबाबतची तक्रार त्याची दुसरी पत्नी स्वरूपा संभाजी निकम हिने कुडाळ पोलीस ठाण्यात दिली आहे.
तक्रारीत स्वरुपा यांनी म्हटले आहे, माझ्या राशीमध्ये मंगळ असल्यामुळे विवाह जुळत नव्हता. म्हणून भाऊ पुळास येथील संभाजी निकम यांच्याकडे घेऊन गेला. ते देवदेवतांच्या माध्यमातून लग्न जुळविण्याचे काम करायचे. नोव्हेंबर २०१८ पासून सातत्याने लग्न जुळविण्यासाठी तेथे गेल्यावर संभाजी निकम यांनी तुझे लग्न होणे अशक्य आहे. तुला मंगळ आहे. पण मी तुझ्याशी लग्न करू शकतो. माझे लग्न झालेले नाही, असे सांगितले.
या लग्नाला मुलीच्या घरातून विरोध होता. तरीही ९ जून २०१९ रोजी हुमरस येथील उषा मंगल कार्यालय येथे संभाजी निकमसोबत स्वरुपा यांनी विवाह केला. हा विवाह झाल्यानंतर काही दिवसांसाठी माणगाव येथे भाड्याने राहते घर घेतले. त्यानंतर निकम याने आपला याअगोदर विवाह झाला आहे, असे सांगून पहिल्या पत्नीला कॅन्सर असल्याचे सांगितले. दोन मुलेसुद्धा असल्याचे सांगितले.
त्यानंतर तो स्वरुपा यांना पुळास येथे घेऊन गेला. काही दिवस पत्नीप्रमाणे वागणूक देऊन त्यानंतर मारहाण तसेच छळ करायला सुरुवात केली. जर माहेरच्या लोकांकडून पैसे आणले नाहीस तर तुला ठार मारीन, अशी धमकी देऊन सातत्याने मानसिक छळ केला, अशी तक्रार स्वरुपा यांनी दिली. या तक्रारीनुसार संभाजी निकम याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.