हुतात्मा स्मारक विकास प्रकल्प रखडला
By admin | Published: April 6, 2015 11:09 PM2015-04-06T23:09:27+5:302015-04-07T01:27:04+5:30
महाराष्ट्र-गोवा सीमेवरील प्रश्न : पर्यटनाच्यादृष्टीने विकास केल्यास बांदा शहराला फायदा--समस्या बांदा शहराच्या
नीलेश मोरजकर - बांदा --गोवा स्वातंत्र्य संग्रामातील सत्याग्रहींच्या स्मरणार्थ महाराष्ट्र- गोवा राज्यांच्या सीमेवर पत्रादेवी येथे उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकाचा ‘पिकनीक पाँर्इंट’ अंतर्गत विकास करण्याचा प्रकल्प रखडला असून या स्मारकाचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास केल्यास याचा फायदा बांदा शहराला होणार आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या स्मारकाचा विकास करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, अद्यापर्यंत कामास सुरुवात न झाल्याने या स्मारकाच्या विकास प्रकल्पास केव्हा सुरुवात होणार असा सवाल उपस्थित होत आहे.
पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारक हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे आहे. बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांना या स्मारकाचा इतिहास समजावा, या दृष्टिकोनातून या स्मारकाचा विकास प्रकल्प राबविण्याचा निर्णय गोवा शासनाने घेतला होता. विकास आराखड्यानुसार या स्मारकाच्या पिकनिक पाँर्इंटचे काम दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय जागेचा विस्तार करुन त्यामध्ये ऐतिहासिक टप्पे निर्माण करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात गोवा मुक्ती लढ्याचा इतिहास व ज्यांनी या लढ्यासाठी बलिदान दिले, त्यांची माहिती देण्यात येणार आहे.
गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बारा वर्षापूर्वी या स्थळाचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून विकास करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, गोवा शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे हा प्रकल्प रखडला होता. हे स्मारक दुर्लक्षित राहिल्याने स्मारकाविषयी सीमावासियांच्या मनात असलेल्या भावना दुखावल्या गेल्यात.
ऐेतिहासिक विभागातील पहिल्या स्पॉटवर नियकालिके, पुस्तिका यांच्या सहाय्याने स्वातंत्र चळवळीविषयी जनजागृती निर्माण करणे, खादीचा पुरस्कार, पोर्तुगीज सरकारच्या कार्यक्रमांवर बहिष्कार यांचा समावेश आहे. सत्याग्रह या दुसऱ्या स्पॉटवर सत्याग्रह, आंदोलने व राम मनोहर लोहियांसारख्या प्रमुख व्यक्तींना अटक, सभा, गोवा विमोचन समिती इत्यादी बाबी, तर स्पॉट क्रमांक तीनवर पत्रादेवी येथे स्वातंत्रसैनिकांचा मृत्यू व या ठिकाणी अनेकांना झालेली अटक याची माहिती देण्यात येणार आहे. स्पॉट क्रमांक चारवर निर्घृण हत्या व अत्याचार, अनेकांना झालेली अटक, त्यांचा छळ व तुरुंगात झालेला सत्याग्रहींचा मृत्यू, स्पॉट पाचवर त्यानंतरचे राजनैतिक प्रयत्न व विविध माध्यमांमुळे संग्रामाची आंतरराष्ट्रीय प्रसिध्दी व शेवटच्या स्पॉटवर गोवामुक्ती आणि विशेषत: 'आॅपरेशन विजय'चे सचित्र दर्शन होणार आहे. या ऐतिहासिक टप्प्याबरोबरच या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना वृक्षांच्या सानिध्यात आनंद लुटण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. भव्य पटांगण, ९०० घनमिटर जागा व्यापलेला प्रचंड तंबू मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात येणार आहे. याशिवाय पक्षी निरीक्षणासाठी साहित्य, अडथळा शर्यत, झुलता पूल, जगंलवाटा, जलक्रीडा, जंगल भ्रमंती यांचा आनंदही घेता येणार आहे. विविध कार्यक्रमांसाठी खुला रंगमंच, व्यवस्थापक कार्यालय, स्त्रिया व पुरुषांसाठी प्रसाधनगृहे, नौकानयनासाठी धक्का अशा अनेक सुविधांचा या पिकनिक पॉर्इंटमध्ये समावेश आहे.
गोवा मुक्ती लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. आजही विविध भागातून पर्यटक याठिकाणी येतात. मात्र पर्यटकांना सेवा सुविधा मिळत नसल्याने पर्यटक याठिकाणी अधिक काळ थांबत नाहीत. रखडलेला ‘पिकनिक स्पॉट’ पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी पर्यटकांत वाढ होवून ते एक विरंगुळ्याचे ठिकाण बनणार आहे. गोवा मुक्तीसाठी ज्या विरांनी हौतात्म्य पत्करले त्यांचा इतिहास आजच्या पिढीला समजावा यासाठी या प्रकल्पाचे काम हे लवकरात लवकर सुरु होणे हे गरजेचे आहे.
....असा आहे
पिकनिक पॉर्इंट
हुतात्मा स्मारक परिसरात या प्रकल्पासाठी ८० हजार घनमिटर जागा गोवा शासनाने राखून ठेवली आहे. या ठिकाणी विविध ऐतिहासिक टप्पे निर्माण करण्यात येणार आहेत. पर्यटकांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था आहे. स्वातंत्रसंग्रामातील सहा प्रमुख ऐतिहासिक देखावे दाखविणारे सहा प्रमुख प्रसंग उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक ठिकाणी या प्रसंगाशी निगडीत दृश्ये, भित्तीचित्रे, लेणी दर्शविण्यात येणार आहेत.
हुतात्मा स्मारकाविषयी
साडेचारशे वर्षे गोवा पोर्तुगीजांच्या मगरमिठीत होता. भारत स्वातंत्र झाल्यानंतरही तब्बल चौदा वर्षे गोवा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. भारताच्या स्वातंत्रप्राप्तीनंतरच खऱ्या अर्थाने गोवा मुक्ती उठावास सुरुवात झाली. गोवा स्वातंत्र होण्यासाठी कित्येक आंदोलने झालीत. त्यानंतर गोवा मुक्ती लढ्यात ३१ सत्याग्रही शहीद झालेत. त्यापूर्वी सामुदायिक सत्याग्रह १९५४ साली झाला. या लढ्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब, बंगाल, बिहार, तामिळनाडू, आसाम, आंध्रप्रदेश या राज्यांतील सत्याग्रही शहीद झालेत. गोव्याला पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी भारतातील विविध राज्यांतील तसेच शेजारील सिंधुदुर्गातील सत्याग्रही शेकडोंच्या संख्येने शहिद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ गोवा शासनाने पत्रादेवी येथे भव्य असे हुतात्मा स्मारक उभारले आहे.पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास झाल्यास याचा फायदा बांदा शहराला होणार आहे. यासाठी गोवा शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
सीमेवरील पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाच्या पर्यटन विकासासाठी बांदा ग्रामपंंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. गोवा मुक्ती लढयात बांदावासियांचा देखिल सहभाग मोठया प्रमाणात होता. या मु्क्ती लढ्यात सहभागी होणाऱ्यांना बांदावासिय मदत करत. यामुळे पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचा विकास झाल्यास याचा फायदा बांदा शहराला होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गोवा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना या स्मारकाच्या विकासासाठी निवेदन देण्यात येणार आहे.
- मंदार कल्याणकर, सरपंच, बांदा
सीमेवरील पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाच्या पर्यटन विकासासाठी बांदा ग्रामपंंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. गोवा मुक्ती लढयात बांदावासियांचा देखिल सहभाग मोठया प्रमाणात होता. या मु्क्ती लढ्यात सहभागी होणाऱ्यांना बांदावासिय मदत करत. यामुळे पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचा विकास झाल्यास याचा फायदा बांदा शहराला होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गोवा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना या स्मारकाच्या विकासासाठी निवेदन देण्यात येणार आहे.
- मंदार कल्याणकर, सरपंच, बांदा