Maharashtra Vidhan Sabha 2019 : शिवसेनेसोबतचे वैर संपणार? पहा, काय म्हणाले राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 01:40 PM2019-10-12T13:40:49+5:302019-10-12T13:57:07+5:30
मी नम्रच आहे, शिवसेनेने त्याचा बोध घ्यावा.असे सांगून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेतील कटुता संपवण्याबाबत केलेल्या आव्हानाला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेले वैर संपणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कुडाळ : मी नम्रच आहे, शिवसेनेने त्याचा बोध घ्यावा.असे सांगून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेतील कटुता संपवण्याबाबत केलेल्या आव्हानाला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेले वैर संपणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कुडाळ येथे प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी राणे त्याठिकाणी आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांना छेडले असता, त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मी नम्र आहे शिवसेनेने त्याचा बोध घ्यावा,असे त्यांनी म्हटले आहे.
मालवण विधानसभा मतदारसंघाचे भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते झाले.यावेळी जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर,महाराष्ट्र स्वाभिमान महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे,तालुकाध्यक्ष विनायक राणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त देसाई तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना राणे यांनी सांगितले की या जिल्ह्यात तिन्ही उमेदवार भाजपचे असून भाजपचा विजय निश्चित होणार आहे. याठिकाणी देसाई यांनाही सुमारे तीस हजारच्या वर मताधिक्य मिळणार आहे.आमदार वैभव नाईक हे योगायोगाने आमदार झाले आहेत. त्यांनी आता आमचे अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांच्या समोर विजय होऊन दाखवावे. मग जर नारायण राणे यांचे नाव द्यावे असा सल्लावजा टोला त्यांनी आमदार नाईक यांना लगावला.
शिवसेना व राणे यांचे संबंध सुधारावेत या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मी शिवसेनेवर टीका करीत नाही. मी नम्र आहे. मात्र शिवसेनेने बोध घ्यावा, असा सल्ला शिवसेनेला दिला. तसेच आज शिवसेनेकडे उमेदवार नाही त्यामुळे त्यांना आयात उमेदवार आणावे लागले. मात्र आमच्याकडे उमेदवारांची संख्या मोठी आहे, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.