पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मी नाराज नाही, त्यांनी मला नेहमीच सन्मान दिला- छत्रपती संभाजीराजे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 03:14 PM2021-05-31T15:14:12+5:302021-05-31T15:14:50+5:30
संभाजीराजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.
सिंधुदुर्ग: मराठा समाजाचे आरक्षण व इतर प्रश्नांसंदर्भात राज्यसभेचे सदस्य छत्रपती संभाजीराजे यांनी गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील अन्य महत्वाच्या नेत्यांची भेट घेतली. संभाजीराजे यांनी सरकारला तीन पर्याय सुचविले आहेत. तसेच आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत समाजाच्या विकासासाठी पाच मागण्याही सरकारसमोर मांडल्या आहेत. त्यामुळे येत्या ६ जूनपूर्वी या मागण्यांवर ठोस कार्यवाही करावी, अन्यथा शिवराज्याभिषेकदिनी किल्ले रायगडावरून आंदोलनाची हाक देऊ. तेव्हा कोरोना वगैरे काही पाहणार नाही, असा इशाराही खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी अनेकदा वेळ मागूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिली नाही, अशी जाहीर नाराजी संभाजीराजे यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे संभाजीराजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र याबाबत आता स्वत: संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजीराजे आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजे म्हणाले की, मोदींवर नाराज असण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी मला नेहमीच सन्मान दिला आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून त्यांनी मला राज्यसभेत नेमलं आहे. हे सगळं असलं तरी एक खासदार म्हणून आमच्या भावना मांडणं चुकीचं नाही. त्यामुळं मराठा आरक्षणाबाबत मत सांगण्याचा माझा प्रयत्न राहील, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी मला उद्याही भेटीसाठी वेळ देऊ शकतात. पण हा वैयक्तिक भेटीचा प्रश्न नाही. समाजाचा विषय आहे. सगळ्या खासदारांना घेऊन मला त्यांना भेटायचं आहे, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, संभाजीराजे हे तौक्ते चक्रीवादळामुळं सिंधुदुर्ग किल्याच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आले होते. मात्र, समुद्र खवळलेला असल्यामुळं त्यांना किल्यावर जाता आलं नाही. समुद्र शांत झाल्यानंतर ते पाहणी करतील अशी शक्यता आहे.
मागील आठवड्यात कोकण किनारपट्टीवर आलेल्या चक्रीवादळामूळे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री शिवराजेश्वर मंदिराचे नुकसान झाले त्याची पाहणी करण्यासाठी आलो होतो. परंतू, समुद्र खवळलेला असल्याने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता आले नाही. त्यामुळे श्रीशिवराजेश्वराचे दुरूनच दर्शन घेतले.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 31, 2021
... pic.twitter.com/8fgPBcOthd
मोदींनी ४० वेळा भेट दिल्याचे संभाजीराजे सांगत नाहीत- चंद्रकांत पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वेळा भेट दिली नाही, हे सांगितले जाते. परंतु त्यांनी याआधी ४० वेळा भेट दिली ते खासदार संभाजीराजे का सांगत नाही, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.