'मला बोलता येतं पण मी उद्या बोलेन', राज ठाकरेंचा विरोधकांना सुचक इशारा
By अनंत खं.जाधव | Published: November 30, 2022 08:12 PM2022-11-30T20:12:35+5:302022-11-30T20:13:09+5:30
राज ठाकरे कोल्हापूरचा दौरा आटपून सायंकाळी उशिरा सावंतवाडीत दाखल झाले.
सावंतवाडी: 'मला बोलता येतं पण मी उद्या बोलेन', असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सिंधुदुर्गात एन्ट्री करताच विरोधकांना सुचक इशारा दिला आहे. ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापूरचा दौरा आटपून सायंकाळी उशिरा आंबोली मार्गे सावंतवाडीत दाखल झालेल्या राज यांचे मनसे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शिवाजी चौकात जोरदार स्वागत केले. यावेळी मनसे विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे, मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, मनसे नेत्या अनिता माजगावकर, जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, शहर प्रमुख आशिष सुभेदार, अनिल केसरकर, दया मेस्त्री यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते.
राज ठाकरे यांचे सावंतवाडी मध्ये आगमन होताच मनसे कार्यकर्त्यांसह नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये त्यांची एक छबी टिपण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी ठाकरे यांनी काही क्षण गाडीतून उतरून कार्यकर्त्यांना व नागरिकांना अभिवादन केले, त्यानंतर ते शिवाजी चौकातून थेट बाजारपेठ मार्गे मनसे कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. यावेळी त्यांना मोती तलावाचे सौंदर्य ही चांगलेच भावले.
कार्यालयात प्रवेश करताच उपस्थित कार्यकर्त्यांना रामेश्वर प्लाझा या मुख्य बाजारपेठेतील इमारतीमध्ये जागेचे दर काय, आपल्याला तिथे कार्यालय करायचे आहे, असे सांगत उपस्थितांना सुखद धक्का दिला.जागेचा दर विचारा असेही सांगितले आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. उपस्थित पत्रकारांनी ठाकरे यांना बोलणार का?असे विचारताच मला बोलता येते, पण आज नाही उद्या सविस्तर बोलेन, असे म्हणत त्यांनी सूचक इशारा दिला. सध्या ठाकरे यांच्या निशाण्यावर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील काही नेते तसेच राज्यपाल आहेत. त्यामुळे उद्या काय बोलतील याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.