Sudha Murthy: "मला संभाजी भिडेंबद्दल काहीही माहिती नाही, थोरले असल्याने पाया पडले"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 10:52 PM2022-11-09T22:52:08+5:302022-11-09T23:11:25+5:30
‘संवाद लेखकाशी’ उपक्रमांतर्गत सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात सुधा मूर्ती यांची मुलाखत घेण्यात आयोजित करण्यात आली होती
प्रसिद्ध लेखिका पद्मश्री डॉक्टर सुधा मूर्ती ह्या सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून त्यांनी 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये भाग घेतला होता आणि या शो मधून मिळालेली सर्व रक्कम बापार्डे कॉलेजच्या उभारणीसाठी या शिक्षण संस्थेत देणगी स्वरूपात दिली होती. आज, बुधवारी बापार्डे येथील नव्याने उभारण्यात आलेल्या कॉलेजचे उद्घाटन पद्मश्री डॉ. सुधा मूर्ती यांच्या हस्ते झाले. दरम्यान, सिंधुदुर्ग दौऱ्यात त्यांनी पत्रकारांशी बोलताना संभाजी भिडेंच्या पाया पडल्याबद्दलचं स्पष्टीकरणही दिलं.
‘संवाद लेखकाशी’ उपक्रमांतर्गत सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात सुधा मूर्ती यांची मुलाखत घेण्यात आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, त्यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्या त्यांच्या पायाही पडल्या होत्या. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याविषयी आयोजकांकडून स्पष्टीकरणही देण्यात आलं. सुधा मूर्तींच्या कार्यक्रमाचं नियोजन सुरू होतं. तेव्हापासून दिवसाला भिडेंकडून दोन तीन फोन येत होते, असा दावा यात करण्यात आला होता. आता, स्वत: सुधा मूर्ती यांनी संभाजी भिडेंबद्दल आपणास काहीही माहिती नाही, असे म्हटले आहे.
"त्यांचं पर्सनल मत मला माहिती नाही, पण ते थोरले माणूस आहेत, ही इज एन ओल्ड मॅन, आमची संस्कृती आहे, की थोरल्या माणसाला बघितलं की पाया पडायचं, त्यांचं मत काय, मतभेद काय, त्यांच्याशी मी काही बोललेच नाही त्याबद्दल" असं सुधा मूर्तींनी सांगितलं. "ते म्हणाले तुमचा टाईम द्या, मी म्हटलं माझ्याकडे वेळ नाही, मी खूप बिझी आहे, फेब्रुवारी-मार्चमध्ये बघते एवढंच, त्यांच्याबद्दल मला काहीही माहिती नाही, पेपरमध्ये नि ट्विटरमध्ये आलं तेव्हा माहिती झालं" असंही सुधा मूर्तींनी सांगितलं.
बापर्डे गावात भेट, शिक्षणसंस्थेला मदत
डॉ. सुधा मूर्ती आज बापार्डे गावात आल्या होत्या. यावेळी त्यांनी बापार्डे ग्रामपंचायतीला भेट देत ग्रामपंचातीने राबविलेल्या विविध उपक्रमांची व पुरस्काराबाबत थोडक्यात माहिती सरपंच संजय लाड व ग्रामसेवक शिवराज राठोड यांच्याकडून जाणून घेतली. डॉ. सुहास राणे यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी शैक्षणिक तसेच गावच्या समाजकामातही घेतं असलेल्या पुढाकारामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावची एक वेगळी ओळख देश, राज्यपातळीवर निर्माण करण्याचे काम या गावाने केले आहे. बापार्डे ग्रामपंचायत सरपंच संजय लाड व ग्रामसेवक शिवराज राठोड यांच्या कामाचेही विशेष कौतुक केले.
कुरुंदवाडमधील घरीही दिली भेट
मोडकळीस आलेले वासे, तुळ्या आणि लोंबकळणारी जळमटं यातून वाट काढत सुधा मूर्ती यांनी कुरुंदवाड येथील आपल्या घराची पाहणी करीत आठवणींना उजाळा दिला. माझे घर, येथील जिव्हाळा कधीच विसरू शकत नाही, कोल्हापूरची कन्या असल्याचा सार्थ अभिमान आहे, अशी भावना सुधा मूर्ती यांनी व्यक्त केली. त्यांनी नृसिंहवाडीतील श्रीदत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते.