... अन् रिटायर होताना 'ते' लालपरीसमोर नतमस्तक झाले, अक्षरशः रडले!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 07:22 PM2020-08-08T19:22:45+5:302020-08-08T20:47:24+5:30
सेवानिवृत्त होताना लालपरीसमोर नतमस्तक होत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करणाऱ्या वाहक चंद्रशेखर जाधव यांच्या सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या त्या फोटोने सर्वांनाच भावूक केले
वेंगुर्ला : महाराष्ट्र परिवहन महामंडळामध्ये गेली ३८ वर्षे लालपरीचे वाहक (कंडक्टर) म्हणून समर्थपणे सेवा केली. त्याच लालपरीसमोर सेवानिवृत्त होताना नतमस्तक होत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करणाऱ्या वाहक चंद्रशेखर जाधव यांच्या सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या त्या फोटोने सर्वांनाच भावूक केले.
मूळच्या सोलापूर येथील असलेल्या चंद्रशेखर जाधव कुटुंबाचे गेली सत्तर वर्षे या परिवहन महामंडळाशी घट्ट नाते जडले होते. त्यांचे वडील भगवान जाधव हे एसटी चालक म्हणून १९६२ मध्ये परिवहन मंडळात सावंतवाडी येथील एसटी आगारात रुजू होत सेवा त्यांनी दिली होती. तर त्यांचा वारसा जपत १९८२ मध्ये चंद्रशेखर जाधव यांनी वाहक (कंडक्टर)म्हणून आपल्या सेवेस सावंतवाडी याच आगारामध्ये प्रारंभ केला.
त्यामुळे बऱ्याच वेळा वडील चालक व मुलगा वाहक म्हणून लालपरीची सेवा प्रवाशांना देताना आपणही एकत्र प्रवास केला. काहींच्याच असा दुर्मिळ योग वाट्याला येतो. त्यामुळे एसटीविषयी असलेली आत्मीयता वाढीस लागली. वडील आपल्या चाळीस वर्षांच्या सेवेनंतर १९९२ मध्ये सेवानिवृत्त झाले. मात्र, चंद्रशेखर जाधव यांचे या लालपरीशी घट्ट नाते जडले.
पुढे सेवेत बदली होऊन विविध आगारात काम करण्याची संधी मिळाली. तीच निष्ठा आणि कामाविषयी असलेली आत्मीयता वाढतच गेली. जीवनातील अर्धे आयुष्य लालपरी संगे घालवताना अनेकांशी संबंध येऊन मैत्रीचे तसेच आपुलकीचे नातेही याच लालपरीने तयार केले, असे ते सांगतात.
कुटुंब परिवहनपासून दूर जाण्याची खंत
घरातील दोघेजण गेली सत्तर वर्षे परिवहन मंडळाशी जोडलो गेल्याने आपल्या मनात एसटीविषयी आदर निर्माण झाला. मात्र, आपल्या पुढील पिढीने वेगळे क्षेत्र निवडल्याने आपले कुटुंब आता परिवहनपासून दूर जाणार असल्याची खंत जाधव यांना आहे.
अनेक लोकांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण त्यांचे सहप्रवाशी झालो याचा आनंद काही औरच असतो. आपल्या ३८ वर्षांच्या सेवेत नेहमीच प्रवास असताना साधा अपघात होण्याचा प्रकार कधीच घडला नाही.
गेली पंधरा वर्षे वेंगुर्ला आगारात एसटीची सेवा देत असतानाच ३१ जुलै रोजी सेवेतील शेवटची किरणपाणी आरोंदा-वेंगुर्ले फेरी पूर्ण करून आपल्या लाडक्या लालपरीला निरोप देताना जाधव तिच्यासमोर श्रीफळ वाढवून नतमस्तक झाले. आपल्या डोळ्यातील अश्रूंनी त्यांनी लालपरीचा निरोप घेतला.