मला अद्याप विधानसभा अध्यक्षांची नोटीसच नाही - वैभव नाईक
By सुधीर राणे | Published: July 12, 2023 04:46 PM2023-07-12T16:46:42+5:302023-07-12T16:58:32+5:30
शिवसेना पक्षातून बाहेर पडलेले आमदार अपात्र ठरतील
कणकवली: राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीसा पाठवल्याचे म्हटले आहे. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी आमदार असताना अद्यापही मला कोणतीही नोटीस आलेली नाही. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
राज्यातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी कणकवली येथे प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.ते म्हणाले, विधानसभा अध्यक्षांकडून अद्यापही मला कोणतीही नोटीस आलेली नाही. कारण आमचा मुख्य पक्षप्रतोद निश्चित आहे, हे न्यायालयात सिद्ध झालेले आहे. त्यामुळे पुढील काळात शिवसेना पक्षातून बाहेर पडलेले आमदार अपात्र ठरतील, असा विश्वासही आमदार नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
..तोवर सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करु शकत नाही - नार्वेकर
भारतीय संविधानाने कायदेमंडळ व न्यायपालिकेचे अधिकार व कार्यक्षेत्र निश्चित करुन दिलेले आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष मनमानी किंवा घटनाबाह्य कृती करत नाहीत, तोपर्यंत याविषयात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. तूर्त आता आमदारांना अपात्रतेच्या मुद्यावर नोटीसा पाठवल्या आहेत. त्यावर त्यांची बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळही देण्यात आला आहे. अपात्रतेसंबंधीच्या प्रत्येक याचिकेवर सुनावणी घेऊन निर्णय देण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे न्यायालय आपल्याला एका विशिष्ट कालावधीत हा मुद्दा निकाली काढण्यास सांगेल, असे वाटत नाही, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.