पाणीटंचाईवर आदर्श मॉडेल
By admin | Published: May 19, 2016 10:22 PM2016-05-19T22:22:09+5:302016-05-20T00:02:10+5:30
कुडाळवासीयांचा उपक्रम : लोकसहभागातून भंगसाळ नदीतील गाळ उपसा
रजनीकांत कदम --कुडाळ --कुडाळ भंगसाळ नदीच्या पात्रात वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढण्यासाठी कुडाळातील सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन लोकसहभागातून युद्धपातळीवर गाळ काढण्याचे काम केल्याने मे महिन्यातही भंगसाळ नदीत लाखो लिटर पाणी जमा झाले आहे. येथील नदी गाळमुक्त करून पाण्याची पातळी वाढण्यासाठी व नदी स्वच्छ करण्यासाठी कुडाळकरांनी संघटित होऊन सुरू केलेला हा उपक्रम म्हणजे जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी एक प्रकारचे मॉडेल उपक्रम आहे व असे उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात राबविल्यास पाणीटंचाई निश्चितच दूर होईल यात तिळमात्र शंका नाही.
कुडाळ भंगसाळ नदीपात्रातील गाळ गेली अनेक वर्षे न काढल्यामुळे येथील नदीच्या पात्रात गाळाचे छोटे मोठे डोंगर तयार झाले आहेत. यामुळे येथील नदीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात प्रत्येकवर्षी घटत आहे. येथील नदीपात्रातील गाळ काढून नदीतील पाण्याची पातळी वाढेल व कुडाळ शहराबरोबरच अन्य आजूबाजूच्या गावांना मुबलक पाणीपुरवठा होईल, तसेच नदीही स्वच्छ होईल. या उद्देशाने कुडाळ येथील सामाजिक संघटनांनी एकत्र येत येथील नदीपात्रातील गाळ महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून काढण्यासाठी लोकसहभागातून पुढाकार घेतला.
या गाळ काढण्याच्या उपक्रमामध्ये प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी कुडाळ येथील रोटरी क्लब, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, लायन्स क्लब, बार असोसिएशन, ध्येय प्रतिष्ठान, डॉक्टर मेडिकल, इंडियन मेडिकल असोसिएशन, केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन, कुडाळ तालुका व्यापारी संघटना, कुडाळ तालुका पत्रकार समिती, डंपर चालक मालक संघटना तसेच इतर सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे.
या गाळ काढण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते दि. ११ मे रोजी झाला. या शुभारंभानंतर गेले आठ दिवस कुडाळ भंगसाळ नदीतील गाळ काढण्याचे काम सर्वजणांनी संघटित होऊन युध्दपातळीवर सुरू केले आहे.
शासनाचा एक रुपयाचाही निधी नाही
नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी व नदी सुस्थितीत राखण्यासाठी खरेतर शासनाने विविध योजना राबविणे गरजेचे आहे. जेणेकरून येथील पाणीटंचाईवर मात करता येईल. मात्र, कुडाळ भंगसाळ नदीतील गाळ हा शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून लोकसहभागामार्फत काढला जात आहे. मात्र, यासाठी शासनाकडून एक रुपयाचाही निधी दिला गेला नाही.
संजय भोगटे यांनी
केले होते आंदोलन
१गेली अनेक वर्षे कुडाळ भंगसाळ नदीतील गाळ न काढल्यामुळे भंगसाळ नदीतील पाण्याची पातळी घटत आहे तसेच नदीचे पात्र बदलल्यामुळे नदी किनाऱ्यालगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनींचीही मोठ्या प्रमाणात धूप होत आहे.
२येथील गाळ काढण्यात यावा व जर का शासनाला जमत नसेल तर तो लोकसहभागातून काढू, अशी भूमिका कुडाळचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांनी घेतली. आतापर्यंत आंदोलने व बेमुदत उपोषण करून वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी त्यांना गाळ काढण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते.
लोकप्रतिनिधींकडूनही कौतुक
या उपक्रमाला शासनाने मंजुरी दिली आहे. सर्व सामाजिक संघटना, कुडाळातील लोकांबरोबरच सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यात सहभाग घेतला असून खासदार विनायक राऊत, आमदार नीतेश राणे व आमदार वैभव नाईक यांनीही या उपक्रमस्थळी भेट देत या उपक्रमाचे
व उपक्रम राबविणाऱ्यांचे कौतुक केले
आहे.
संघटितपणाचा वेगळा आदर्श
कुडाळ भंगसाळ नदीतील गाळ काढण्यासाठी कुडाळातील सर्व सामाजिक संघटना व लोक एकत्र येऊन हा उपक्रम राबवीत आहेत हा उपक्रम म्हणजे भविष्यात जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण कोकण व राज्यासाठी संघटितपणाचा एक वेगळा आदर्श असल्याचे हे एक उदाहरण आहे.