रामायण, महाभारताचा आदर्श राज्यकर्त्यांनी घ्यावा
By admin | Published: December 1, 2015 10:41 PM2015-12-01T22:41:07+5:302015-12-02T00:40:19+5:30
सच्चिदानंद शेवडे : गुहागर येथील श्री देव कोपरीनारायण देवस्थानतर्फे कार्तिकोत्सवानिमित्त व्याख्यानमाला
गुहागर : देश चालवताना रामायण, महाभारताचा आदर्श राज्यकर्त्यांनी घ्यायला हवा. कृष्णासारखी नीती व रामासारखी वागणूक हवी. आज लोकशाही नावाची राजेशाही आली आहे. देशाला महासत्ता बनवण्यासाठी प्रत्येकाने जागरूक नागरिक व्हायला पाहिजे, असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.
गुहागर शहरातील वरचा पाट येथील श्री देव कोपरीनारायण देवस्थान फंड आयोजित कार्तिकोत्सवामध्ये ‘भारत काल, आज आणि उद्या’ या विषयावरील व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालिकेत ते बोलत होते. यावेळी शेवडे म्हणाले की, आम्ही आज आम्हालाच ओळखत नाही. धर्मशिक्षण देण्याची घराघरात पुस्तकांचं वैभव जपलं पाहिजे. वेद हे मौखिक परंपरेने पुढे आले आहेत. ऋषींनी जे दिसलं ते आमच्यासाठी लिहून ठेवलं. मंत्राच्या उच्चारामध्ये ताकद असते. त्याच्या रुचीचे भाषांतर करून लाभ मिळत नाही. तपश्चर्येनंतर जगकल्याणासाठी ऋषीमुनींनी ग्रंथ लिहिले, त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. प्राचीन भारत ही रत्नांची खाण आहे, त्यातून दगड, गोटे जमवलेत, तर आपण कपाळकरंटे ठरू, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, जग आज तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. रशिया व चीन विरोधात अमेरिका अशा गटात देश विभागले जात आहेत. अफगणिस्तान व पाकिस्तान भारताच्या सीमेवर असल्याने या महायुद्धात आपणही खेचले जाऊ शकतो. तसे न झाल्यास भारत एक महासत्ता म्हणून उदयास येऊ
शकतो.
पूर्वी घर हे संस्कार केंद्र होते, ते बंद झाल्याने बाहेर संस्कार केंद्र काढली जाऊ लागली. इंग्रजी भाषेची वैचारिक गुलामी आजही कायम आहे. ब्रिटीशांनी जाणीवपूर्वक जाती निर्माण केल्या आहेत. त्यामुळेच जाती - जाती तेढ निर्माण होत आहे. फ्रेंच व जर्मन जगात मोठा व्यवहार चालणाऱ्या भाषा आहेत. मोघलांनी डोकी मारली, पण इंग्रजांनी बुद्धी मारली. यामुळे मोठे नुकसान झाले. संस्क्त ही परिपूर्ण भाषा आहे, जसं लिहितो, तसा उच्चार होतो, त्यापाठोपाठ दुसरी मराठी भाषा
आहे.
आयुर्वेद जुनी औषधी पद्धती असूनही जगासमोर मार्केटिंग न झाल्याने मागे आहे. प्राचीन काळात वर्ण, जातीभेद होते, पण द्वेषभावना नव्हती. पूर्वी जातीचा विचार जेवण व लग्नासाठी व्हायचा, आता या दोन गोष्टी सोडून बाकी सर्व कामांसाठी जात पाहिली जाते. जगात चार रंगाचे लोक आहेत. हे सर्व भारतातही आहेत. आपल्या संस्कृतीत विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते. संस्कृ ती येथे प्राणीजातीसाठी कृ तज्ञता शिकवते, इतकी सहिष्णुता असूनही आपण असहिष्णू कसे, असा शेवटी सवालही शेवडे यांनी केला. (प्रतिनिधी)
गुरूकुल शिक्षण पद्धतीत स्वभाव ओळखून शिक्षण दिले जात होते. आजच्या लोकशाहीतही घराणेशाही बळावली आहे. अशिक्षित लोक आज शिक्षित लोकांवर राज्य करत आहेत. पूर्वी राजाची निवड करताना त्याचे प्रजेशी वागणे कसे आहे, हे पाहिले जात होते. त्याच्यानुसारच निवड केली होती, असे सांगून लोकशाहीवर टीकास्त्र सोडले.
देशाला महासत्ता बनवण्यासाठी प्रत्येकाने जागरूक नागरिक व्हावे.
डॉ. सच्चिदानंद शेवडे यांची आजच्या लोकशाही प्रणालीवर टीका.
भारत काल, आज आणि उद्या विषयावर व्याख्यानमालेतून मांडले विचार.
इंग्रजी भाषेची वैचारिक गुलामी आजही कायम असल्याचे मत.
घर हे संस्कार केंद्र बंद झाल्याने बाहेर संस्कार केंद्र उघडावी लागली.