भाजपने वचन पाळले असते तर ही वेळ आली नसती : अनंत गीते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:07 AM2019-11-22T00:07:49+5:302019-11-22T00:07:59+5:30
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीआधी दिलेले समान सत्ता वाटपाचे वचन भाजपने पाळले नाही. त्यामुळेच शिवसेनेला वेगळ्या वाटेने जावे लागत आहे. ...
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीआधी दिलेले समान सत्ता वाटपाचे वचन भाजपने पाळले नाही. त्यामुळेच शिवसेनेला वेगळ्या वाटेने जावे लागत आहे. भाजपने वचन पाळले असते तर ही वेळ आली नसती. त्यामुळे आता टीका करून काही उपयोग नाही. कारण टाळी एका हाताने वाजत नाही, असा टोला माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी गुरुवारी रत्नागिरीत एका पत्रकार परिषदेत भाजपला हाणला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती झालेली असताना काँग्रेस आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय योग्य वाटतो का, या पत्रकारांच्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते.
राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आजच्या महाराष्टÑाची गरज लक्षात घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील. युती तुटल्याने जे घडलंय ते स्वीकारून पुढे जाण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष भिन्न विचारांचे असले, तरी सध्या देशात राजकारण याच धर्तीवर चालले आहे. नवीन आघाड्या होत आहेत. देशभर हे सुरू आहे. त्यामुळे प्रयोग नवीन वाटला तरी यशस्वी होऊ शकतो, असे गीते म्हणाले.
भाजपने शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्यास नकार दिला हे योग्य वाटते का, असे विचारता गीते म्हणाले, भाजपला काय वाटते हा भाजपचा प्रश्न आहे. मी शिवसेनेचा नेता आहे. माझ्या संघटनेच्या संदर्भात मी भूमिका मांडणे योग्य आहे. गेल्या पाच वर्षांत आम्ही सरकारमध्ये होतो. त्यावेळी वाद झाले असले तरी त्यावेळची स्थिती आणि आताची स्थिती यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबत मौन
महाविकास आघाडीची सत्ता येत असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी शिवसैनिक करीत आहेत. आपले काय मत आहे, आपला त्यांना पाठिंबा आहे का, याबाबत विचारता शिवसेनेत आदेश चालतो. शिवसेना शिस्तबद्ध पक्ष आहे. त्यामुळे निवडून आलेल्या शिवसेना आमदारांनी पक्षप्रमुखांनाच सर्वाधिकार बहाल केले आहेत. त्यामुळे ठाकरे जो निर्णय घेतील, तो शिवसैनिक म्हणून आम्हाला मान्यच आहे व असेल, असे सांगत ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत का, या प्रश्नाचे उत्तर देणे गीते यांनी टाळले.
सदाचाराचा पराभव
आपला यावेळी रायगड मतदारसंघातून पराभव झाला, याला नेमकी काय कारणे आहेत, स्वकीयांमुळे पराभव झाला का, यावर बोलताना गीते यांनी आपण पराभव मान्य केला असल्याचे सांगितले. मात्र, हा पराभव सदाचाराचा आहे व भ्रष्टाचाराचा विजय झाला आहे, असा टोलाही त्यांनी तटकरे यांचे नाव न घेता लगावला.