आमदार केसरकर हक्कभंगाची धमकी देत असतील तर ती त्यांची दडपशाही - संजू परब

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 04:21 PM2022-03-19T16:21:07+5:302022-03-19T16:22:04+5:30

आमदार दीपक केसरकर यांना ज्याप्रमाणे सेनेत किंमत राहीली नाही, त्याचप्रमाणे प्रशासनातही राहिली नाही.

If MLA Kesarkar is threatening to infringe, then it is his repression says Sanju Parab | आमदार केसरकर हक्कभंगाची धमकी देत असतील तर ती त्यांची दडपशाही - संजू परब

आमदार केसरकर हक्कभंगाची धमकी देत असतील तर ती त्यांची दडपशाही - संजू परब

Next

सावंतवाडी : आंबोली कबुलायतदार हा गावाचा प्रश्न आहे. त्यामुळे तो प्रश्न सोडविण्यासाठी आमदार म्हणून तुम्हाला बोलविण्याचा संबंध येतोच कुठे? गावकरी आपला प्रश्न कोणाकडे ही मांडू शकतात. त्यामुळे केसरकर हक्कभंगाची धमकी देत असतील तर ती त्यांची दडपशाही आहे, असा सवाल भाजपा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केला. आम्ही मंजूर केलेल्या ठरावाचे श्रेय लाटत असल्याचा आरोप ही परब यांनी यावेळी केला.

ते आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित, अमित परब आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना परब म्हणाले, आमदार दीपक केसरकर यांना ज्याप्रमाणे सेनेत किंमत राहीली नाही, त्याचप्रमाणे प्रशासनातही राहिली नाही. कबुलायतदार गावकर प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात कोकण आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत आमदारांनी आपल्याला आमंत्रण दिले नसल्याचे सांगत अधिकारी आपल्याला किंमत देत नाहीत याची कबुली त्यांनी पुन्हा एकदा दिली आहे. याच रागातून संबंधित अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणण्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. मात्र, कोकण आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांची कोणीही भेट घेत चर्चा करू शकते. त्यामुळे आमदार केसरकर यांनी आधी अभ्यास करावे नंतर बोलावे, असा सल्लाही परब यांनी दिला.

मुळात केसरकर यांची  ताकदच राहिली नाही. विधानसभा निवडणुकीत ते थोडक्यात निवडून आले. जिल्हा बँक व स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्येही आम्हीच वरचढ ठरलो. आता तर नगरपालिका निवडणुकीत सेनेकडे सर्व जागा वर उभे करण्यासाठी उमेदवारही सापडत नाहीत अशी परिस्थिती  आहे. सेनेकडेच नाहीत तर महाविकासआघाडी तिन्ही पक्षांकडे सर्व प्रभागात स्वबळावर लढण्यासाठी उमेदवार नाहीत. त्यामुळे त्यांना आघाडी करून लढण्याची भाषा करावी लागत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

मोती तलावाच्या काठावर सेल्फी पॉइंटचा ठराव आम्ही सर्वानुमते घेतला होता. त्यामुळे तो बदलण्याचा अधिकार आमदार किंवा मुख्याधिकाऱ्यांना नाही. आता त्या ठिकाणी मापे घेतल्याची नाटकं करत त्याला आपणच मंजुरी दिल्याचे ते भासवत आहेत. बॅरिस्टर नाथ पै सभागृह भाजीमंडई याबाबतही ते लोकांची दिशाभूल करत आहेत. आगामी निवडणुकीमुळे केसरकर हतबल झाले असून खोटे बोला पण रेटून बोला त्यांची ओळख असल्याची टीकाही परब यांनी केली.

Web Title: If MLA Kesarkar is threatening to infringe, then it is his repression says Sanju Parab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.