सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा खासदार भाजप विचाराचा हवा - मंत्री रविंद्र चव्हाण
By अनंत खं.जाधव | Published: April 20, 2023 02:26 PM2023-04-20T14:26:37+5:302023-04-20T14:27:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास या भूमिकेला खऱ्या अर्थाने चालना दिली
सावंतवाडी : देशाला महासत्ता बनवायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला चारशे खासदार निवडून आणावे लागतील. त्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा खासदार हा भाजपच्या विचाराचा निवडून आणावा लागेल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी भाजपचा विचार घराघरात पोचवावा असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गांधी चौकात भाजपच्या महाविजय रॅलीची समारोप सभेत ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार निलेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाध्यक्ष राजन तेली, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, शैलेंद्र दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब आदी. उपस्थित होते.
मंत्री चव्हाण म्हणाले, सबका साथ सबका विकास या भूमिकेला खऱ्या अर्थाने कुणी चालना दिली असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. त्यामुळेच 14 वित्त आयोगाचा पैसा प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळू लागला. देश आज वेगळ्या दिशेने चालला आहे. हे फक्त मोदींमुळेच शक्य झाले. दोन खासदारापासून सुरू झालेली भाजप आज देशात एक नंबर वर आहे. त्याग आणि समर्पण मधून निर्माण झालेली भाजपा आहे. कधी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता पक्षाचा विचार घेऊन अनेक कार्यकर्ते पुढे जात आहे. कोलगाव ग्रामपंचायत चे कौतुक करतो त्यानी पारदर्शकता दाखवून दिली सर्वाना आता डिजिटलमधून गेल पाहिजे असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले.
जिल्हा नियोजनचे पैसे शंभर टक्के खर्च करण्यात आले त्याचे श्रेय घ्यायला शिका. अधिकारी चुकीच्या पध्दतीने वागत असतील तर कार्यकर्त्यांनी शांत राहून चालणार नाही. सर्व सामान्य जनतेचा पैसा त्याच्यापर्यंत पोचला पाहिजे. मागील अडीच वर्षांत निधी आला नाही, पण मागील नऊ महिन्यात मोठ्या प्रमाणात निधी आला. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या अभिनंदनाचे ठराव ग्रामपंचायतीत घेतले गेले पाहिजे असे आवाहनही मंत्री चव्हाण यांनी केले.
निलेश राणे म्हणाले, मागील काही वर्षात जिल्ह्यात निधी येण्याचे प्रमाण कमी झाले होते. मागच्या अडीच वर्षांत कोविडचे कारण देत नियोजनचा निधी कमी केला. महाराष्ट्रात सर्वाधिक ग्रामपंचायती सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या निवडून आल्या त्यामुळे आम्हाला जास्ती जास्त निधी मिळावा असे आवाहन राणे यांनी केले.
तेली म्हणाले, कोण कुठे जाणार मला माहित नाही. मला भाजपने एवढे प्रेम दिल ते मी कधीही विसरू शकणार नाही. शतप्रतिशत भाजप म्हणून काम करूया येथील जनतेने एवढे भरभरून प्रेम दिले, मोठ्याप्रमाणात ग्रामपंचायती भाजपकडे आहेत. त्यामुळे भविष्यात ही भाजपला येथील जनता साथ देईल असा विश्वास व्यक्त केला.