हिंमत असेल तर भाजपा नेत्यांच्या वाटेला जा -प्रमोद जठार
By admin | Published: February 20, 2017 08:40 PM2017-02-20T20:40:33+5:302017-02-20T20:40:33+5:30
शत्रू पक्षातील सुभेदाराच्या सुनेचाही सन्मान करणाऱ्या शिवरायांची जयंती उत्साहात साजरी केली जात असताना माजी मुख्यमंत्र्यांच्या वरवडे
ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 20 - शत्रू पक्षातील सुभेदाराच्या सुनेचाही सन्मान करणाऱ्या शिवरायांची जयंती उत्साहात साजरी केली जात असताना माजी मुख्यमंत्र्यांच्या वरवडे गावात काँग्रेसच्या गुंड कार्यकर्त्यानी भाजपच्या जिल्हा परिषदेच्या महिला उमेदवारावर भ्याड हल्ला केला आहे. यानिमित्ताने या कार्यकर्त्यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राला विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे. मात्र , या कार्यकर्त्यांमध्ये हिम्मत असेल तर त्यानी भाजपच्या नेत्यांच्या वाटेला जावून दाखवावे. असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केले.येथील भाजप संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा नेते संदेश पारकर उपस्थित होते.
यावेळी प्रमोद जठार म्हणाले , सुसंस्कृत सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीच्या वेळी नशेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या कलमठ जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार प्रज्ञा ढवण यांच्या अंगावर गाडी घातली. त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्याना मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ केली. ही सिंधुदुर्गच्या इतिहासाला काळीमा फासणारी घटना आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. तसेच राणेंच्या दहशतवादाची हि शेवटची उचकी ठरेल एवढे मतदान जनतेने निर्भीडपणे भाजपला करावे. तसेच गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्यांची जागा दाखवून द्यावी.
दहशतवादाने मतदाराना मतदानापासून वंचित ठेवणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे या घटनेकडे लक्ष वेधण्यात येणार आहे. तसेच काँग्रेसच्या कलमठ जिल्हा परिषद व तेथील दोन्ही पंचायत समिती मतदार संघातील उमेदवारांबाबत तक्रार करणार आहोत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांची भेट घेवून या घटनेची माहिती त्यांना देण्यात येणार असल्याचेही जठार यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, भाजपला जिल्ह्यात या निवडणुकीत सुयश मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या २५ पेक्षा जास्त आणि पंचायत समितीच्या ५० पेक्षा जास्त जागांवर भाजपा विजयी होईल.तसेच आतापर्यन्त एकूण मतदानापैकी भाजपाला मिळणारी १५ % मते या निवडणुकीत ४० % वर पोचतील. संदेश पारकर म्हणाले, राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे. ' सुंभ जळला तरी पीळ अजुन गेला 'नाही. त्यामुळेच वरवडेसारख्या घटना घडत आहेत. जिल्हावासीयांना शांतता हवी आहे. त्यामुळे राणेंच्या ठोकशाहीला जनताच २१ तारखेला मतदानातून हद्दपार करेल,असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)