आठ दिवसात योग्य तोडगा न काढल्यास जनआंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 02:34 PM2019-05-10T14:34:24+5:302019-05-10T14:36:09+5:30
मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे कणकवली शहर तसेच तालुक्यात अनेक समस्या निर्माण झाल्या असून येत्या आठ दिवसात यावर योग्य तोडगा काढण्यात न आल्यास जनआंदोलन करण्यात येईल. वेळप्रसंगी महामार्गाचे काम बंद पाडण्यात येईल.असा इशारा कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला आहे.
कणकवली: मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे कणकवली शहर तसेच तालुक्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदार कंपनीची मनमानी सुरू असून पावसाळ्यात नागरिकांच्या घरात माती तसेच पाणी भरणार आहे. वाहतूक कोंडीची समस्याही मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. अशा अनेक समस्या निर्माण झाल्या असून येत्या आठ दिवसात यावर योग्य तोडगा काढण्यात न आल्यास जनआंदोलन करण्यात येईल. वेळप्रसंगी महामार्गाचे काम बंद पाडण्यात येईल.असा इशारा कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला आहे.
कणकवली येथील भाजप संपर्क कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, महेश सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संदेश पारकर म्हणाले, मुंबई -गोवा महामार्गाच्या कामाला आमचा विरोध नाही. पण, गेली चार वर्षे या कामामुळे कणकवली शहर तसेच खारेपाटण ते झाराप पर्यंतच्या महामार्ग चौपदरीकरण बाधित जनतेला विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही जनता त्रस्त झाली आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत कोणाकडे न्याय मागायचा हेच या जनतेला समजत नाही . राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच इतर प्रशासकीय यंत्रणा एकमेकांकडे बोटे दाखवत आहेत.
कणकवली शहरात महामार्गाचे काम करताना प्रकल्प बाधितांना योग्य मोबदला देण्यात आलेला नाही. तरीही प्रकल्प बाधित प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करीत आहेत. मात्र, त्यांच्या त्रासात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचा विचार या महामार्गाचे काम करताना तसेच आराखडा तयार करताना करण्यात आलेला नाही. त्यामुळे भविष्यात रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. तर शहरातील अंतर्गत नाल्यांचे काम अपूर्ण असल्याने पावसाळ्यात शहरात पाणी तुंबणार आहे. सर्व शहरच चिखलमय होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, श्रीधर नाईक उद्यान, एस.टी . वर्कशॉप , शासकीय विश्राम गृह ,गांगोमंदिर अशा ठिकाणांकडे जाणाऱ्या रस्त्यांचा विचार न केल्याने मोठी अडचण निर्माण होणार आहे. शहरातील पथदीप बंद आहेत. तसेच भूमिगत वीज वाहिन्या यांचे पुढे काय झाले? याचे उत्तर कुठलीच यंत्रणा द्यायला तयार नाही. त्यामुळे जनतेचा जीव मेटाकुटीस आलेला आहे.
सर्व्हिस रोडची रुंदी कमी असल्याने वाहतुकीला अडसर निर्माण होत आहे. भविष्यात ही समस्या कायम राहणार आहे. या समस्येला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महसूल यंत्रणा , पोलीस प्रशासन , नगरपंचायत प्रशासन , वीज वितरण यासर्वच यंत्रणा जबाबदार आहेत. त्यामुळे या सर्व यंत्रणांची एकत्रितपणे लोकप्रतिनिधींसह बैठक घेऊन लवकरात लवकर ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात गँभिर समस्या निर्माण होणार असून त्याची सर्व जबाबदारी प्रशासणावरच असेल. त्यामुळे येत्या आठ दिवसात याबाबतीत ठोस निर्णय न झाल्यास प्रकल्प बाधितांना घेऊन जनआंदोलन करण्यात येईल.असा इशाराही संदेश पारकर यांनी यावेळी दिला.
प्रकल्प बाधितांनी संपर्क साधावा !
खारेपाटण ते झाराप या परिसरातील ज्या महामार्ग प्रकल्प बाधितांवर अन्याय झाला असेल त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा.तसेच या जनांदोलनात सहभागी व्हावे .असे आवाहनही संदेश पारकर यांनी यावेळी केले.