उद्धवसेनेत हिम्मत असेल तर स्वतंत्र निवडणूक लढवावी, नितेश राणे यांचे आव्हान
By सुधीर राणे | Published: October 9, 2024 05:10 PM2024-10-09T17:10:21+5:302024-10-09T17:13:14+5:30
काँग्रेस आणि उद्धवसेना म्हणजे..
कणकवली: भाजप पक्ष प्रत्येक निवडणूक स्वतःच्या हिमतीवर आणि ताकतीवर लढवतो. त्यामुळेच हरयाणात तिसऱ्यांदा सत्ता प्राप्त केली आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही स्थापन करून सर्वाधिक मते मिळवली आहेत. उद्धवसेनेत हिम्मत असेल तर त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी. महाविकास आघाडीच्या कुबड्या घेऊन निवडणूक लढण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या ताकतीवर विधानसभेच्या २८८ जागा महाराष्ट्रात लढाव्यात असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले आहे. हिम्मत असेल तर दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनीविधानसभा स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा करावी असेही म्हणाले.
कणकवली येथे प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. राणे म्हणाले, पत्रकार परिषदेतून आणि अग्रलेखातून काँग्रेसवर डोळे वटारण्यापेक्षा हिम्मत असेल तर उद्धवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे. त्यानंतर भारतीय जनता पार्टीबरोबर स्वतःची तुलना करण्याची हिम्मत करावी.
'दोन ढ विद्यार्थ्यांनी एकमेकाला सल्ले देण्यासारखे'
उद्धव ठाकरे ज्यांच्या सोबत आहेत त्या काँग्रेसला हरियाणा आणि जम्मू-काश्मीर जिंकता आलेले नाही. काँग्रेस आणि उद्धवसेना म्हणजे वर्गातील दोन ढ विद्यार्थ्यांनी एकमेकाला सल्ले देण्यासारखे आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव सेनेचा स्ट्राईक रेट खराब होता. आता विधानसभेत काँग्रेस नापास होत चालली आहे. राज्यात ह्यांना केवळ मनोरंजन म्हणून बघितले जाते असा टोला लगावला.
शिवस्मारकाला विरोध करणारा कोणाचा प्रचार करतोय ?
अरबी समुद्रात शिव स्मारकला विरोध करणारा कोणाचा प्रचार करतोय हे आधी पहा. वकील असीम सरोदे मातोश्रीचे जावई आहेत. त्यानी अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. म्हणून शिवस्मारकाचे काम थांबले आहे असेही नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.