ग्रामस्थांनी जमीन दिली तर सी वर्ल्ड होईल
By Admin | Published: December 14, 2014 10:20 PM2014-12-14T22:20:00+5:302014-12-14T23:47:58+5:30
दीपक केसरकर : मालवण तालुका दौऱ्यात माहिती
मालवण : वायंगणी-तोंडवळी येथे होऊ घातलेल्या सी वर्ल्डबाबत या भागाचे खासदार विनायक राऊत यांनी ग्रामस्थांची मते जाणून घेतली असून खासदारांशी चर्चा करूनच आपण याबाबत भूमिका स्पष्ट करू असे सावध वक्तव्य राज्याचे ग्रामविकास व वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले. हे वक्तव्य करतानाच त्यांनी वायंगणी-तोंडवळी गावातील ग्रामस्थ सी वर्ल्डसाठी जमीन देण्यास तयार असतील तर त्याठिकाणी सी वर्ल्ड होईल अन्यथा सी वर्ल्ड दुसरीकडे होईल हे सांगण्यास केसरकर विसरले नाहीत.
रविवारी मालवण दौऱ्यावर आलेल्या राज्याचे ग्रामविकास व वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला.
यावेळी शिवसेना आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना केसरकर म्हणाले, सीआझेडबाबत स्थानिकांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत. त्या केंद्र सरकारच्या नियमानुसारच असून त्यानुसारच आपणाला वागावे लागेल. मात्र गोव्यात ज्याप्रमाणे किनारपट्टीतील बांधकामांना तात्पुरते संरक्षण दिले गेले आहे तशा प्रकारचे धोरण याठिकाणी राबविणे शक्य आहे.
सीआरझेडबाबत किनारपट्टीवरील घरांची डागडुजी करण्यास मुभा दिली आहे. हा एक मच्छिमारांना दिलासा आहे. किनारपट्टीवरील मच्छिमारांनी निवास न्याहारी योजनेचा लाभ घेऊन पर्यटन व्यवसाय करावा. निवास न्याहारी योजनेचे परवाने काढले नसतील तर ते काढून घ्यावेत. पर्यटन खात्याच्या सचिवांशी चर्चा करून त्या परवान्यांबाबत सुलभ अशी व्यवस्था करून देऊ. त्यामुळे मच्छिमारांनी तसेच पर्यटन व्यावसायिकांनी निवास न्याहारी योजनेचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत असेही केसरकर
म्हणाले. (प्रतिनिधी)