पुरावे दिल्यास राजकारणातून संन्यास
By admin | Published: March 4, 2016 10:42 PM2016-03-04T22:42:13+5:302016-03-04T23:59:49+5:30
शीतल राऊळ : ५० कोटींच्या कामांचे श्रेय लाटू नये
बांदा : जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत यांनी बांदा मतदारसंघात आपण ५0 कोटींची विकासकामे केली असल्याची माहिती पत्रकातून दिली आहे. यातील ९0 टक्के कामे ही भाजपच्या माध्यमातून मंजूर केली असून त्याचे फुकाचे श्रेय कामत लाटत आहेत. बांद्यात दुर्मीळ असलेल्या कामतांनी पत्रकबाजी करण्यापेक्षा बांदा शहरातील जनतेशी संपर्क ठेवावा. तसेच पत्रकातील केलेली कामे कामतांनी कागदोपत्री पुराव्यानिशी सिद्ध केली तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ, असे जाहीर आव्हान भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सरपंच शीतल राऊळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत प्रमोद कामत यांना दिले.
प्रमोद कामत यांनी पत्रक छपाई करुन गेल्या चार वर्षात केलेल्या विविध विकासकामांची यादी प्रसिद्ध केली आहे. याचा समाचार घेण्यासाठी भाजप व शिवसेनेच्यावतीने संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शीतल राऊळ, सरपंच मंदार कल्याणकर यांनी प्रमोद कामत यांच्या कार्यपद्धतीवर व पत्रकातील चुकीच्या माहितीवर चौफेर टीका केली.
राऊळ म्हणाले की, जिल्हा परिषदेचे वार्षिक बजेटच १00 कोटी रुपयांचे आहे. त्यामुळे त्यातील निम्मी रक्कम ५0 कोटी रुपये प्रमोद कामत यांनी बांदा मतदारसंघात खर्ची घातले हे म्हणणे हास्यास्पद आहे. प्रमोद कामत हे बांदा जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य आहेत. मात्र बांदा शहरातील जनतेला त्यांचे कित्येक दिवस दर्शनच होत नाही. ते नेहमी बांद्याच्या बाहेर असतात, मग बांद्यात विकासकामे कधी करणार असा सवाल उपस्थित केला. पंतप्रधान ग्रामसडकमधून रस्ते केल्याचे ते सांगत आहेत, मात्र ही योजना भाजप शासनाच्या काळातील आहे. व या योजनेतील कामे ही टप्प्याटप्प्याने होत आहेत. त्यामुळे त्याचे श्रेय कामतांनी घेण्याचा प्रश्नच येत नाही.
पत्रकात कामतांनी म्हटलेली बांदा शहरातील स्ट्रिट लाईट, शहरातील संकिर्ण रस्ते, स्मशानभूमी संरक्षक भिंत बांधकाम, मच्छीमार्केट ते पाटो पूल रस्ता ही कामे नागरी सुविधा योजनेअंतर्गत करण्यात आली आहेत. या कामांसाठी बांदा ग्रामपंचायतीने १५ टक्के लोकवर्गणी भरली आहे. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम हे माजी जिल्हा परिषद सदस्या अर्चना पांगम यांच्या कार्यकाळात मंजूर झाले आहे. त्यामुळे या कामासाठी ८७ लाख रुपये आपणच मंजूर केल्याचे
त्यांची पत्रकात म्हटले आहे हे चुकीचे आहे.
वाफोली येथील नवीन नळपाणी योजनेसाठी २९ लाख रुपये, बांदा-शेर्ले डोंकल रस्ता हा महाराष्ट्र शासनाच्या एमआरडी योजनेतून करण्यात आला आहे. बांदा-डिंगणे रस्त्यासाठी ६५ लाख रुपयांचा निधी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निधीतून मंजूर करण्यात आला आहे. शेर्ले येथील शेटकरवाडी विहीर, राउतवाडी व मळगावकरवाडी येथील अडीच लाख रुपये निधीच्या दोन पायवाटा पंचायत समिती निधीतून करण्यात आल्या आहेत. त्यामुुळे एकंदर कामत यांची पत्रकबाजी ही निव्वळ जनतेची धूळफेक करणारी आहे.
येत्या वर्षभरानंतर निवडणूक येणार असल्याने कामत आपण बांदा मतदारसंघात विकासकामे केल्याचा खोटा आव आणत आहेत. कामत यांनी कामेच केली नसल्याने पुढील निवडणुकीत जनता त्यांना नाकारणार आहे हे लक्षात आल्यानेच ते खोटी पत्रकबाजी करीत आहेत. त्यांनी ५0 कोटींची विकासकामे केल्याचा कागदोपत्री पुरावा दिल्यास पुढील निवडणुकीत त्यांना बिनविरोध आम्ही निवडून देउ, तसेच आपण राजकारणातून संन्यास घेऊ, असे राऊळ यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री दीपक केसरकर, मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून येत्या वर्षभरात सावंतवाडी तालुक्यात २ कोटी रुपयांची विकासकामे करण्यात येणार असून यामध्ये बांदा शहरातील कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यावेळी पंचायत समिती सदस्या श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य अशोक सावंत, शिवसेना विभागप्रमुख बाळा वाळके, उपविभागप्रमुख संजय आईर, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सनी काणेकर, शहर अध्यक्ष सिध्देश पावसकर, अर्चना पांगम, राजेश चव्हाण उपस्थित होते. (प्रतिनिधी)