विकासकामांकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
By admin | Published: April 16, 2015 10:10 PM2015-04-16T22:10:16+5:302015-04-17T00:07:58+5:30
मालवण पंचायत समिती सभा : चित्रा दळवी यांनी केली टीका
मालवण : पंचायत समितीच्या महिला सदस्यांना त्यांच्या प्रभागातील विकासकामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी सविस्तर माहिती दिली जात नाही. या विकासकामांची बिले मंजूर करण्यात दिरंगाई तसेच या कामांकडे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे ही कामे रखडली जातात. त्यामुळे ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागते. परंतु दुसरीकडे पुरूष पंचायत समिती सदस्य हे मुरलेले असल्याने अधिकाऱ्यांकडून त्यांची कामे त्वरित केली जातात, असा आरोप करीत अधिकाऱ्यांचे महिला पंचायत समिती सदस्यांकडे दुर्लक्ष का? असा सवाल पंचायत समिती सदस्या चित्रा दळवी यांनी मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत उपस्थित केला. यावर सभापती सीमा परूळेकर यांनी यापुढे अधिकाऱ्यांनी महिला सदस्यांच्या कामांना प्राधान्य देत कामाबाबत वेळोवेळी माहिती पुरवावी, अशा सूचना केल्या.मालवण पंचायत समितीची मासिक सभा गुरूवारी सभापती सीमा परूळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती देवानंद चिंदरकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सदस्य उदय परब, राजेंद्र प्रभूदेसाई, प्रसाद मोरजकर, उदय दुखंडे, चित्रा दळवी, भाग्यता वायंगणकर, सुजला तांबे, हिमाली अमरे, श्रद्धा केळुसकर आदी व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रसाद मोरजकर यांनी महसूल विभागाकडून वाळू व्यावसायिकांवर होणाऱ्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करीत मालवण तालुक्यात इतर तालुक्यांपेक्षा वाळू व्यावसायिकांकडून जास्त दंड आकारला जातो, त्यामुळे याबाबतची माहिती मागविण्यात यावी, असे सांगितले. तर देवानंद चिंदरकर यांनी सीआरझेडच्या उल्लंघनप्रकरणी तारकर्ली- देवबाग येथील पर्यटन व्यावसायिकांवर करण्यात आलेल्या फौजदारी कारवाईबाबत नाराजी व्यक्त करीत मुळात सीआरझेडची व्यावसायिकांना अडचण जाणवत असल्याचे ते म्हणाले. उदय परब यांनी तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून पावसाळ््यापूर्वी या रस्त्यांची दुरूस्ती व्हावी, अशी मागणी केली. तर उदय दुखंडे यांनी भगवंतगड ते बांदिवडे दरम्यान असलेल्या खारलॅण्ड बंधाऱ्याची दुरवस्था झाल्याने त्याची तत्काळ दुरूस्ती व्हावी, अशी मागणी केली. यावेळी गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या तांडा सुधार योजनेची माहिती दिली. यामध्ये धनगर वस्त्या सुधारण्यासाठी तेथील लोकसंख्येच्या आधारावर अनुदान मिळणार आहे. यासाठी सर्व्हे करण्यात येणार असून या वस्त्यांमधील उणिवा दूर करून रस्ते, शौचालय, गटारे, वाचनालय, विद्युतीकरण, पिण्याचे पाणी अशा सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत, असे पराडकर म्हणाले. (प्रतिनिधी)
नळपाणी योजनेसाठी जुने पाईप वापरतात
मालवण पंचायत समिती सभेत चित्रा दळवी यांनी तळगाव खांदवाडी येथील नळपाणी योजनेच्या दर्जाहीन कामावरून संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नवीन नळपाणी योजनेच्या कामांसाठी जुने पाईप वापरले जात असल्याचे त्यांनी सांगितले.