फणस लागवडीकडे दुर्लक्ष

By admin | Published: April 30, 2015 11:10 PM2015-04-30T23:10:26+5:302015-05-01T00:17:21+5:30

फणसापासूनच्या पदार्थांना मागणी : व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याची गरज

Ignore the cultivation of jackfruit | फणस लागवडीकडे दुर्लक्ष

फणस लागवडीकडे दुर्लक्ष

Next

बाळकृष्ण सातार्डेकर - रेडी  सध्या ग्रामीण भागातील आंबा आणि काजू या पिकांना वाढती मागणी असल्याने या हंगामी पिकांकडे शेतकरी आकर्षित झाला आहे. मात्र, याचवेळी कोकणचे वैशिष्ट्य असणाऱ्या फणस लागवडीकडे दुर्लक्ष होत आहे. आंबा, काजू यांच्याबरोबरच फणसापासून बनविण्यात येणाऱ्या विविध पदार्थांना स्थानिक बाजारपेठेत मागणी असल्याने फणसाची व्यावसायिक दृष्टीने लागवड करण्याची गरज आहे.
कोकणात कापा आणि बरका (रसाळ) अशा फणसाच्या दोन प्रजाती आढळतात. कापा जातीच्या फणसाचे गरे खुसखुशीत असतात. या फणसाच्या गऱ्यांचा उपयोग प्राधान्याने खाण्यासाठी आणि भाजीसाठी केला जातो. तर बरका जातीच्या फणसाचे गरे मऊ, गोड, बुळबुळीत असल्याने या गऱ्यांचा उपयोग खाण्याबरोबरच इतर विविध पदार्थ बनविण्यासाठी केला जातो. परंतु, आर्थिक उत्पन्न देऊ शकणाऱ्या फणसाची व्यापारी आणि व्यावसायिक तत्त्वावर अजूनही लागवड होत नाही. सध्या मिळणारे उत्पन्न जुन्या आणि नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या फणसांपासून मिळते.
कोकण परिसरात पावसाळी दिवसांत फणसांच्या बीची तिखट आमटी, तसेच बियाही उकडून खाल्या जातात. वटपौर्णिमेच्या दिवशी तर महिलांच्या वाणामध्ये फणसाला मोठे महत्त्व असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वटपौर्णिमेच्या अगोदर फणसांचे शेकडो ट्रक मुंबई, पुणे येथे रवाना होतात. या सर्व उत्पन्नांमुळे स्थानिकांना हंगामी रोजगार प्राप्त होतो. बाजारभावाचा विचार करता, कापा फणस ७० ते १५० रुपये, बरका फणस ७० ते १२० रुपयांना मिळतो. तर सुटे गरेही प्रती डझन दहा रुपये असा दर आहे. सध्या शिरोडा, आरोंदा, रेडी पंचक्रोशीतील शेती बागायतदार या बाजारपेठेमध्ये लहान-मोठे कापे व बरका फणस आणत आहेत. ‘बाहेरून काटे आणि आतून गोड’ अशी ओळख असलेला फणस व्यावसायिकदृष्ट्या मात्र उपेक्षितच राहिला. आंबा, काजू, कोकम, जांभूळ आदी ‘कोकणी मेव्यात’ महत्त्वाचे स्थान असलेला फणस काही मोजके पदार्थ आणि बाजारातील विक्रीपुरताच मर्यादित राहिला. या पिकाच्या विविध उत्पादनांविषयी शेतकरी आणि बागायतदारांना चर्चासत्रे, शिबिरे आदींच्या माध्यमातून माहिती देऊन उत्पादन वाढविण्यास प्रोत्साहित केल्यास याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्याला होईल, यात शंका नाही.

व्यावसायिकदृष्ट्या उत्पादन होणे गरजेचे
कोकणात फणस लागवडीसाठी योग्य, पोषक वातावरण आणि जमीन आहे. आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात हंगाम सुरू होतो व एप्रिल-मे महिन्यात परिपक्व फळ मिळते. फणस लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी, फणस प्रक्रिया उद्योगाची भरभराट होण्यासाठी फणसाच्या विखुरलेल्या जाती प्रदर्शनाच्या माध्यमातून एकत्र करून फणसाची जोपासना करणे काळाची गरज आहे. यासाठी आंबा-काजूप्रमाणे फणस लागवडीसाठी कृषी विभागाने अनुदान देणे आवश्यक आहे.


रोजगार निर्मितीचे साधन
बरका फणसापासून फणसपोळी, जॅम, चिवडा, जॅकफ्रूट, जेली, गोड लोणचे, चिप्स, प्लेक्स, स्कॅश पेय तसेच दैनंदिन आहारात सांदण, वडे, पापडी, आदी पदार्थही बनविले जातात. तसेच ग्रामीण भागातील बचतगटांमधूनही फणसापासून विविध सहउत्पादने बनविण्यात येत असून, त्यांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. तसेच गोड लोणचे बनविण्यासाठी कोवळा फणस वापरला जातो. पिकलेल्या फणसाच्या गऱ्याच्या बियांपासून जेली व जॅम, बरक्या फणसांपासून फणसपोळी, काप्या गऱ्यांपासून चवदार तिखट चिवडा, कच्च्या फणसांपासून चिप्स, बरक्यापासून स्कॅशपेय आदी विविध पदार्थ बनविले जातात.


शासनाने शेतकऱ्यांना
प्रोत्साहित करावे
शासनाने शेतकरी आणि बागायतदारांना इतर पिकांप्रमाणेच फणसाचेही पीक घेण्यास प्रोत्साहित करावे. तसेच फणसावर प्रक्रिया करणारे प्रकल्प आणावेत. तसेच लागवडीसाठी अनुदानही द्यावे. जेणेकरून येथील शेतकरी व बागायतदार फणस पिकाकडे आकर्षित होऊन जास्तीत जास्त उत्पादन घेईल.
- प्रसाद रेडकर,
बागायतदार, रेडी

Web Title: Ignore the cultivation of jackfruit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.