गणेश घाटाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष

By admin | Published: April 15, 2015 11:19 PM2015-04-15T23:19:39+5:302015-04-16T00:01:48+5:30

रस्ता खड्डेमय : गणेश भक्तांची समस्या, नागरिकांची दुरूस्तीची मागणी--समस्या कुडाळ शहराच्या

Ignore the distractions of Ganesh Ghat | गणेश घाटाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष

गणेश घाटाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष

Next

रजनीकांत कदम - कुडाळ भंगसाळ नदी येथील गणपती विसर्जनाकरिता बांधण्यात आलेल्या गणेश घाटाकडे जाणाऱ्या खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीबाबत संबंधित प्रशासनाने कोणतीच पावले उचलली नसल्याने येथील गणेश भक्तांना गणपती विसर्जनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही खड्डेमय व चिखलाच्या रस्त्यावरून मोठी कसरत करत जावे लागणार आहे. याकडे लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. कुडाळ येथील गणेश भक्तांना गणेश चतुर्थी काळात गणपतीचे विसर्जन चांगल्या पद्धतीने करता यावे, याकरिता ग्रामपंचायत व संबंधित बांधकाम विभागाने भंगसाळ नदीच्या किनारी गणेश घाट काही वर्षांपूर्वी बांधला आहे.
परंतु सध्या या गणेश घाटाची व येथे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा व शासनाची, लोकप्रतिनिधींची उदासिनता पाहता याचा यंदाही फटका गणेश भक्तांना बसणार, हे मात्र निश्चित आहे. याच रस्त्याचा वापर करून दरवर्षी कुडाळातील हजारो गणेशभक्त गणपती विसर्जनासाठी घेऊन भंगसाळ नदीकडे जातात. मात्र, गेली कित्येक वर्षे हा रस्ता खड्डेमयच आहे. गणपती विसर्जनासाठी कुडाळवासीय गणपती घेऊन येताना ढोलताशांच्या गजरात ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढीत गणपती गणेश घाटाच्या दिशेने आणतात. परंतु मुख्य रस्ता सोडून भंगसाळ नदीकडे जाणारा खड्डेमय रस्ता सुरू झाला की सगळेच भक्तगण शांत होतात. कारण खड्डेमय व काळोख असलेल्या रस्त्यावरून चालताना प्रत्येक भक्तगण आपल्या लाडक्या बाप्पाला जपत असतो. तर कोणी खड्डे चुकवित चालत असतो, गाडी हाकीत असतो. त्यामुळे या सर्व कसरतीत या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि जयघोष करीत येणारे भक्तगण गणेश घाटाकडे जाईपर्यंत शांतच असतात.
गणेश चतुर्थी ही पावसाळ्याच्या कालावधीत येत असल्याने या रस्त्यावर मोठे खड्डे, पाणी व चिखलाचे साम्राज्य प्रस्थापित होते. त्यामुळे येथून चालताना प्रत्येकाची तारांबळ उडते. येथील गणपती विसर्जन रात्री उशिरापर्यंत चालते. मात्र, याठिकाणी रस्त्याच्या कडेला योग्यप्रकारे विद्युत रोषणाई नाही आणि असली तरी बंदावस्थेत असते. या एका समस्येला जनतेला सामोरे जावे लागते. दरवर्षी प्रशासन येथील समस्येचे निराकरण करण्याबाबत विसरलेले असते. परंतु चतुर्थी आली, की प्रशासनाला जाग येते. तेव्हा येथील रस्ता दुरुस्ती, गणेश घाटाची स्वच्छता व लाईट व्यवस्था करण्यासाठी कामे हाती घेतली जातात. परंतु पावसाळी वातावरणामुळे यातील एकही काम व्यवस्थितपणे होत नाही. गणेशचतुर्थी जवळ आली की जाग आलेले प्रशासन या रस्त्यावर पाऊस असल्याने डांबर व खडी घालत नाही व पर्याय म्हणून माती व दगड टाकतात. प्रशासनाने केलेल्या या कामामुळे विपरित परिणाम होऊन या ठिकाणी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य अधिक वाढते.
खड्डेमय असलेल्या रस्त्यावर निदान विद्युत रोषणाई तरी चांगली हवी. परंतु त्याचेही काम ‘तहान लागली की विहीर खोदा’ या म्हणीप्रमाणे चतुर्थी आली की करायला गेल्यावर विद्युत रोषणाईचे कामही पावसामुळे रखडते व रस्त्यावर बहुतांशी अंधाराचे साम्राज्य पसरते. भक्तिभावाने पूजन केलेल्या लाडक्या गणरायाचे चांगल्या पद्धतीने विसर्जन व्हावे, याकरिता भक्तगण भंगसाळ नदीकडे गणपती गाडीमधून घेऊन येत असतात. गणपती मूर्ती नदीकडे विसर्जनासाठी नेताना खड्डेमय व चिखलाच्या रस्त्यामुळे धोकादायक स्थिती निर्माण होते.

रस्ता नूतनीकरणाची गरज
गेली कित्येक वर्षे या रस्त्याचे नूतनीकरण झालेले नसून येथील रस्त्याचे नूतनीकरण पावसाळ्याअगोदर होणे गरजेचे आहे.
मुख्य रस्ता व गणेश घाट याची समांतर पातळी ठेवून रस्ता बनवावा. जेणेकरून गणपती आणणाऱ्या गाड्या सहज येतील. गाड्या वळविण्याकरिता गणेश घाटाच्या जवळील जागेत डांबरीकरण करावे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चांगले गटार बनवावेत. जेणेकरून पाण्याचा निचरा चांगला होईल व रस्त्यावर पाणी येणार नाही.
गणपती विसर्जनास येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची व भक्तगणांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यामुळे रस्त्याचे रुंदीकरण जास्त ठेवावे.



पर्यटनाच्यादृष्टीने वापर व्हावा
नदीकिनारी असलेल्या या गणेश घाटावर बसल्यानंतर भंगसाळ नदीचे सुंदर असे दृश्य दिसते. परंतु गणपती विसर्जनाखेरीज या घाटाच्या स्वच्छतेकडे प्रशासन दुर्लक्ष करते. गणेश घाटाचा विकास गणपती विसर्जनाबरोबर एरवी पर्यटनाच्या दृष्टीने कसा करता येईल, याचाही विचार ग्रामपंचायत व संबंधित प्रशासन, लोकप्रतिनिधींनी केल्यास कुडाळच्या दृष्टीने अत्यंत फलदायक ठरेल.



पावसाळा सुरू व्हायला दोनच महिने शिल्लक राहिले असून, यंदाही गणेश भक्तांना विसर्जनाच्यावेळी चांगल्या सोयी सुविधा देण्याकरिता या गणेश घाटाकडे जाणारा रस्ता व गणेश घाटाच्या दुरुस्तीसाठी किंवा नुतनीकरणासाठी येथील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तत्काळ निर्णय घेणे आवश्यक आहे.
मात्र, हे होण्यासाठी झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी लोकांनी जागृत व्हायला हवे.

Web Title: Ignore the distractions of Ganesh Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.