वारशाने मिळालेल्या पर्यटनस्थळांकडे दुर्लक्ष

By Admin | Published: April 17, 2017 11:36 PM2017-04-17T23:36:23+5:302017-04-17T23:36:23+5:30

व्यावसायिक दृष्ट्याही फायदेशीर : सगळी भीस्त सरकारी यंत्रणांवर, सामाजिक संस्थांसह नागरिक सुस्त

Ignore the heritage of the heritage | वारशाने मिळालेल्या पर्यटनस्थळांकडे दुर्लक्ष

वारशाने मिळालेल्या पर्यटनस्थळांकडे दुर्लक्ष

googlenewsNext


मेहरुन नाकाडे ल्ल रत्नागिरी
अभिमानाने वारसा सांगावा, अशी अनेक प्राचीन, ऐतिहासिक पर्यटनस्थळे रत्नागिरीच्या वाट्याला आली आहेत. पण, दुर्दैवाने सरकारी यंत्रणेवरच अवलंबून असलेल्या लोकांचे, सामाजिक संस्थांचे या सांस्कृतिक वारशाकडे दुर्लक्ष होत आहे. सांस्कृतिक ठेवा म्हणून ज्याचे जनत व्हायला हवे, अशी असंख्य पर्यटनस्थळे कोकणात असून, व्यावसायिक दृष्टीनेही त्याचा खूप मोठा उपयोग आहे. म्हणूनच त्याचे जतन होण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी पुढाकार घ्यायला हवा.
सगळ्याच गोष्टी सरकारी यंत्रणांनी कराव्यात, अशी अपेक्षा केली जाते. जिथे मोठा खर्च अपेक्षित आहे, अशी पर्यटनस्थळे सरकारने विकसित करावीत, ही अपेक्षा रास्त. पण, या पर्यटन्स्थळांची परिपूर्ण माहिती जमवणे आणि पर्यटकांपर्यंत ती पोहोचवणे, ही पर्यटनस्थळे खराब होणार नाहीत, याची काळजी घेणे, या गोष्टी तरी सामाजिक संस्था आणि सर्वसामान्य माणसांनी पुढाकार घेऊन करायला हव्या. जागतिक वारसा हक्क दिन साजरा करताना सर्वसामान्य माणसाने पुढे येणे अपेक्षित आहे.
सह्याद्रीचे खोरे जपायलाच हवे
सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये वनसंपदा अधिक आहे. घनदाट वनसंपदेमुळेच प्राणी, पक्षी यांचे वास्तव्य सह्याद्रीच्या खोऱ्यात पाहायला मिळते. परंतु जंगलतोडीमुळे संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वनसंपदेमध्ये औषधी वनस्पतींचा समावेश आहे. औषधी वनस्पतींचे फायदे कळू लागल्यामुळे या वनस्पतींचे महत्त्वदेखील वाढले आहे. परंतु या वनस्पती नेमक्या कोणत्या? याची ओळख होणे गरजेचे आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यातील बेसुमार वृक्षतोड थांबवून त्याचे संवर्धन व संरक्षण होणे गरजेचे आहे. औषधी वनस्पतींची ओळख होईल शिवाय खोऱ्यातील पशू-पक्षी यांचीही ओळख पर्यटकांना होईल. एकूणच पर्यटनासाठी खोरे संवर्धित करणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून याबाबत कार्यवाही होणे अपेक्षित आहे. प्राचीन काळापासून कोकणाला निसर्गसंपदा उपलब्ध झाली आहे. परंतु या निसर्गसंपदेचे जतन करण्यापेक्षा त्याच्या विनाशासाठीच अधिक प्रयत्न झाले. कोकणात पर्यटन वाढण्यासाठी सह्याद्रीचे खोरे जपणे आवश्यक आहे.
स्वा. सावरकर यांची कोठडी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ब्रिटिशांनी रत्नागिरी येथील विशेष कारागृहात दि. १६ मे १९२१ ते ३ सप्टेंबर १९२३ या कालावधीत बंदिवासात ठेवले होते. कारागृहातील ज्या खोलीत सावरकरांना ठेवण्यात आले होते ती कोठडी स्वातंत्र्यवीरांचे स्मारक म्हणून जतन करण्यात आले आहे. या कोठडीत स्वातंत्र्यवीरांची स्मृती म्हणून भव्य तैलचित्र, सावरकरांच्या गळ्यात अडकविण्यात आलेले साखळदंड, बेड्या, लोहगोळे संग्रहित करून ठेवण्यात आले आहेत.
राजवाड्याची शान टिकायला हवी
ब्रम्हदेशाच्या थिबा राजाला १८८५ साली स्थानबध्द करून इंग्रजांनी रत्नागिरीत आणले. त्याच्यासाठी इंग्रज सरकारने १९१० साली तीन मजली राजवाडा बांधला. सन १९११मध्ये राजा राजवाड्यात राहण्यासाठी गेला. १०६ वर्षांची ऐतिहासिक वास्तू शहराचे भूषण आहे. राजवाड्याच्या गच्चीतून समुद्र दर्शन होते. पुरातन वास्तूच्या दुरूस्तीचे काम गेली कित्येक वर्षे सुरू आहे. पर्यटकांसाठी आकर्षण असलेल्या राजवाडा दुरुस्तीच्या कामाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. राजवाडा परिसर विकासही रखडला आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतो. दुरूस्ती व सुशोभिकरणाचे काम तातडीने करणे गरजेचे आहे.

Web Title: Ignore the heritage of the heritage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.