नाट्यगृहाची उपेक्षा : कोकणातील पहिल्यावहिल्या सांस्कृतिक केंद्राला मोकळा श्वास मिळेल ?

By admin | Published: February 4, 2015 10:13 PM2015-02-04T22:13:20+5:302015-02-04T23:54:01+5:30

सांस्कृतिक केंद्राचा पडदा उघडण्याचे प्रयत्न

Ignore theater: Will the first cultural center of Konkan get breathing freely? | नाट्यगृहाची उपेक्षा : कोकणातील पहिल्यावहिल्या सांस्कृतिक केंद्राला मोकळा श्वास मिळेल ?

नाट्यगृहाची उपेक्षा : कोकणातील पहिल्यावहिल्या सांस्कृतिक केंद्राला मोकळा श्वास मिळेल ?

Next

सुभाष कदम - चिपळूण शहर हे कोकणातील सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. नटवर्य डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या भूमीत कोकणातील पहिलेवहिले इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र १९८५-८६ मध्ये सुरू झाले. परंतु, आज या नाट्यगृहाची उपेक्षा झाली आहे. गेली १० वर्षे दुरुस्तीच्या चक्रव्युहात अडकलेल्या या नाट्यगृहाला आता मोकळा श्वास मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासकीय पातळीवर तशा जोरदार हालचाली सुरू असून, येत्या आठ दिवसांत निविदा प्रक्रिया होणार आहे.
माजी नगराध्यक्ष श्रावणशेठ दळी यांच्या पुढाकाराने या नाट्यगृहाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. शांताराम बुरटे यांच्या कारकीर्दीत या नाट्यगृहाचा प्रथम पडदा उघडला. वास्तुविशारद सुभाष आठल्ये आणि ठेकेदार भागवत, दाभोळकर आणि कंपनी यांनी या इमारतीचे काम केले. त्यावेळी प्रशासक म्हणून, आत्माराम प्रधान व त्यानंतर मुख्याधिकारी अरुण पानसे यांनी हे काम पूर्णत्त्वास नेले. श्रीनिवास गायकवाड हे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते.
स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी चांगले व्यासपीठ नाही. येथील नगर परिषदेने बांधलेले एकमेव असे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र दुरुस्तीअभावी धूळखात पडले आहे. सन २००५मध्ये आलेल्या महापुरात इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात पाणी शिरले आणि केंद्राची दुवस्था झाली. ही इमारत धोकादायक स्थितीत असून, गेली १० वर्षे हे केंद्र बंद आहे. अन्य करमणूक केंद्र नसल्याने करमणुकीच्या विविध कार्यक्रमांपासून रसिकांना वंचित राहवे लागत आहे.
ही इमारत वापरण्यायोग्य नसल्याचा अहवाल आल्याने, हे केंद्र गेली अनेक वर्षे बंद आहे. या केंद्राच्या दुरूस्तीसाठी नगराध्यक्षा सावित्री होमकळस, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, माजी आमदार रमेश कदम यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. या केंद्राची अंतर्गत दुरुस्ती करण्यात येणार आहे. ठाणे येथील एका कंपनीने कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यास सहमती दर्शविली होती. परंतु, मागील दोन्ही सभांना संबंधित ठेकेदार अथवा त्याचा प्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने हे काम आता रखडले आहे. तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याने, आता या इमारतीसाठी लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी याप्रकरणी विशेष लक्ष घातले असून, हे सांस्कृतिक केंद्र पुन्हा डौलाने उभे राहवे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
सांस्कृतिक राजधानी म्हणून, ओळखल्या जाणाऱ्या चिपळूणमध्ये सांस्कृतिक केंद्र होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने पाऊले पडत आहेत. सांस्कृतिक केंद्र हे चिपळूणकरांसाठी भूषणावह गोष्ट आहे. या केंद्रासाठी अंदाजे ५ कोटी रूपये खर्च होणार असून, वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून निधी खर्च करुन मार्चअखेर या केंद्राचे काम सुरु होणार आहे. यापूर्वी डॉ. काशिनाथ घाणेकर स्मृती प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने आकाश थिएटर, ओंकार नाट्यसंस्था, चौकट ग्रुप, स्वेअर थिएटर, समर्थ इंटरटेनमेंट आदी संस्थांनी नगर परिषद प्रशासनाकडे सातत्याने संपर्क केला आहे. हे केंद्र दुरुस्त करण्याबाबत नगर परिषद प्रयत्न करत आहे, असे आश्वासन देऊन दोन वर्षे झाली तरी केंद्राच्या दुरुस्तीस दिंरंगाई का होत आहे? असा प्रश्न आता सतावत आहे.
‘आम्ही चिपळूणकर’ नावाने नव्याने स्थापन झालेली एक संघटना या सांस्कृतिक केंद्रासाठी पुढे आली आहे. युवराज मोहिते, राजन इंदुलकर, संजीव अणेराव, रमाकांत सकपाळ, राजू जाधव आदी मंडळींनी नगराध्यक्षांबरोबर याविषयी चर्चा केली. सांस्कृतिक केंद्राबाबतची वस्तुस्थिती व नगर परिषदेची भूमिका समजून घेतली. त्यानंतर हे सांस्कृतिक केंद्र दुरुस्त करुन जनतेसाठी खुले व्हावे, यासाठी लोकशाही मार्गाने लढा लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याचा एक भाग म्हणून चिपळूणच्या विकासासाठी लोक चळवळ सुरु केली आहे. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राबाबत नगर परिषदेने नकारात्मक व बोटचेपी भूमिका घेतली आहे. हे केंद्र आम्हाला ताबडतोब अद्ययावत करुन हवे आणि आम्ही ते करुन घेणारच, असा या चळवळीचा नारा आहे. प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आल्याने, अंतर्गत सजावट व काम पूर्ण होऊन, पुन्हा एकदा सांस्कृतिक केंद्राचा पडदा लवकरच उघडणार आहे.

नगर पालिकेने कोकणात पहिलेवहिले नाट्यगृह चिपळूण येथे सुरु केले. परंतु, २००५ पासून हे नाट्यगृह बंद असल्याने येथील नाट्यप्रेमींची घोर निराशा झाली आहे. नगर परिषदेचे पदाधिकारी याबाबत पाठपुरावा करत आहेत. परंतु, शासन स्तरावर फाईलचा झालेला घोळ आणि इतर कारणं न पटणारी आहेत. इच्छाशक्ती ठेवून चिपळूणकरांची करमणूक करण्यासाठी हे सांस्कृतिक केंद्र लवकरात लवकर सुरु होणे ही काळाची गरज आहे.
- दीपक कदम, पेठमाप, चिपळूण

दि.८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक केंद्रासमोर मोकळ्या वातावरणात पारावरचा लोकोत्सव साजरा होणार आहे. या उत्सवात चिपळुणातील अनेक कलाकार आपले कलाविष्कार सादर करणार आहेत. कला, नाट्यक्षेत्रातील काही नामवंत कलाकरांनाही यावेळी बोलवण्याचा प्रयत्न आहे.

सध्या सांस्कृतिक केंद्राची अवस्था अतिशय दयनीय आहे. रंगमंचाची मोडतोड झाली आहे. फॅन, साऊंड सिस्टीम, मेकअप रुम बरोबरच एसी व इतर वस्तूंची मोडतोड झाली आहे. येथे नव्याने खुर्च्या बसवाव्या लागणार आहेत. तर सेटही नव्याने उभारावा लागणार आहे. पुन्हा एकदा कात टाकून, हे केंद्र नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.


चिपळूणसारख्या मध्यवर्ती ठिकाणी शासनाने एवढी गुंतवणूक करुन एक सुंदर इमारत बांधली. ती पुन्हा दुरुस्त होऊन त्याचा आनंद जनतेला घेऊ द्या. शासन स्तरावर जर काही अडचणी येत असतील, तर जनतेला बरोबर घेऊन नगर पालिकेने आंदोलन करायला हवे. पण, निखळ मनोरंजनासाठी सांस्कृतिक केंद्राची इमारत लवकरात लवकर सुरु होणे गरजेचे आहे.
- रमाकांत सकपाळ, चिपळूण

Web Title: Ignore theater: Will the first cultural center of Konkan get breathing freely?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.