वीज कंपनीचे खारेपाटणकडे दुर्लक्ष

By admin | Published: August 20, 2015 11:06 PM2015-08-20T23:06:07+5:302015-08-20T23:06:07+5:30

कर्मचारीवर्गाची कमतरता, एकही वायरमन नाही : विविध समस्यांना नागरिकांना जावे लागते सामोरे

Ignoring electricity company's saline | वीज कंपनीचे खारेपाटणकडे दुर्लक्ष

वीज कंपनीचे खारेपाटणकडे दुर्लक्ष

Next

संतोष पाटणकर-खारेपाटणमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा नमुना पुन्हा एकदा जनतेसमोर आला असून खारेपाटण विभागासाठी मंजूर असलेल्या सात वायरमनांपैकी फक्त दोन कर्मचारी काम करीत असून तेही खारेपाटण गावासाठी नियुक्त नसून अन्य गावात काम करीत आहेत. त्यामुळे वायरमन नसणे हे खारेपाटणवासीयांचे दुर्दैव असून वीज कंपनीच्या दृष्टीने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शरमेने मान खाली घालायला लावणारी लाजीरवाणी अशी गोष्ट आहे.
खारेपाटण येथे वीज उपकेंद्र असून येथून सर्वत्र गावांना विद्युत लाईन जोडली आहे. मात्र, खारेपाटण येथील नागरिकांना विविध समस्यांना सध्या तोंड द्यावे लागत असून रात्री- अपरात्री विद्युत पुरवठा खंडित झाल्यास येथे कायमस्वरूपी वायरमन उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना प्रसंगी अंधारात राहावे लागत आहे.
खारेपाटण येथे शाखा अभियंता हे पद मंजूर असून ते भरलेले आहे. ज्युनिअर आॅपरेटर ४ पदे मंजूर असून ४ पदे भरलेली आहेत. मात्र, त्यातील १ कर्मचारी सध्या तीन महिने सातत्याने गैरहजर असून आॅगस्ट महिन्यात कर्मचारी डिसोजा यांनी अतिरिक्त कामामुळे राजीनामा दिल्याचे समजते. म्हणजे प्रत्यक्ष तीन कर्मचारीच कार्यरत आहेत. वरिष्ठ तंत्रज्ञांची दोन पदे मंजूर असून फक्त १ पद भरलेले आहे. एक रिक्त आहे. तसेच तंत्रज्ञ यांची ७ पदे मंजूर असून फक्त २ पदे भरलेली आहेत. त्यापैकी १ शिडवणे व दुसरा कुरंगावणे या गावी कर्मचारी कार्यरत आहे. म्हणजे ५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे खारेपाटणसह अन्य गावांसाठी वायरमन नाही हे प्रथमदर्शनी स्पष्ट होते.
कनिष्ठ तंत्रज्ञ ३ पदे मंजूर असून ३ पदे भरलेली आहेत, असे दाखवले आहे. मात्र, तिन्ही वायरमनांची बदली प्रशासनाच्यावतीने इतरत्र केल्यामुळे याठिकाणी तीन शिकाऊ कर्मचारी देण्यात आले आहेत. त्यांच्याकडे अधिकृत वीज परवाना नसल्यामुळे एखादा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच ७ वायरमनपैकी २ वायरमन नियुक्त असून त्यातील कुरुंगावणे येथील कर्मचारी आॅक्टोबर २०१५ मध्ये सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे संपूर्ण खारेपाटण विभागाला ७ पैकी फक्त १ कर्मचारीच उरणार आहे.

अभियंत्यांची दमछाक
या संदर्भात येथील शाखा अभियंता माळी यांची भेट घेतली असता अपुरा कर्मचारीवर्ग असतानादेखील वेळेचे बंधन न पाळता येथील समस्या सोडविण्याचे काम प्रामाणिकपणे करीत आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत वेळोवेळी कळविले असून रिक्त पदे कधी भरली जातील हे निश्चितपणे सांगता येणार नाही असे सांगितले. परंतु अपुऱ्या कर्मचारीवर्गाला घेऊन काम करणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखे असून अवघे निवृत्तीला २ वर्षे ३ महिने असलेल्या खारेपाटण विद्युत शाखा अभियंता माळी यांची दमछाक होत असल्याचे स्पष्ट जाणवते.

समस्या मिटवाव्यात
खारेपाटण येथे सडलेले, गंजलेले जुने वीज खांब बदलणे, तसेच शहराची व्याप्ती वाढल्याने नवीन वीज खांब टाकणे, लाईन कनेक्शन ओढणे, शहरात खांबावर स्ट्रीटलाईट लावणे, विजेचा उच्चदाब लक्षात घेता नवीन ट्रान्सफार्मर बसविणे हे येथील महत्त्वाचे प्रश्न असून वीज बिलांच्या तक्रारी वाढत आहेत. नवीन मीटर बसविणे, काढणे या कामी वैभववाडी येथे नागरिकांना फेऱ्या माराव्या लागत आहेत. या समस्यांचा विचार करता खारेपाटण येथेच अधिकारीवर्ग देऊन त्यांच्या समस्या खारेपाटण येथेच कशा मिटविता येतील याकडे वीज कंपनीने लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Ignoring electricity company's saline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.