कणकवलीतील नाल्यांच्या कामांकडे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:36 PM2020-06-11T12:36:59+5:302020-06-11T12:38:20+5:30
कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. मात्र, हे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून गटारे, नाले यांची कामे व्यवस्थितरित्या न केल्याने अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अजूनही मोठा पाऊस झालेला नाही. मात्र, गेल्या चार पाच दिवसांत झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या आहेत.
कणकवली : कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. मात्र, हे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून गटारे, नाले यांची कामे व्यवस्थितरित्या न केल्याने अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अजूनही मोठा पाऊस झालेला नाही. मात्र, गेल्या चार पाच दिवसांत झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या आहेत.
सोमवारी दुपारी शहरात झालेल्या पावसाने स्टेट बँकेसमोरील विलास कोरगावकर यांच्या हॉटेलच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चिखलयुक्त पाणी साचले होते. त्यामुळे ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून त्याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कार्यवाही केली आहे. पण त्यांनंतर जोराचा पाऊस न आल्याने तेथील काम योग्यप्रकारे झाले आहे की नाही हे समजू शकलेले नाही.
अशी स्थिती कणकवली शहरात अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे मोठ्या पावसापूर्वी ठेकेदार कंपनीने त्याची दखल घेऊन ती कामे पूर्ण करावीत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. नगरपंचायत प्रशासन तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यासमस्येकडे त्वरित लक्ष न दिल्यास गतवर्षीप्रमाणे नागरिकांच्या दुकानात, घरात पाणी घुसण्याची शक्यता आहे.
महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाच्या शेजारी सर्व्हिस रस्ते बांधण्यात आले आहेत. या रस्त्यांच्या शेजारी काही अंतर सोडून गटारे बांधण्यात आली आहेत. पावसाचे पाणी या गटारात न जाता सर्व्हिस रस्त्यावरच साचत असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालताना त्रास सहन करावा लागत आहे. वाहने या रस्त्यावरून गेल्यावर चिखलयुक्त पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे.
यासमस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे. कणकवली प्रांताधिकारी कार्यालयापासून जवळच असलेल्या रेवडेकर बिल्डिंगशेजारी असलेल्या नाल्याचे काम अर्धवट स्थितीत असून जोरदार पाऊस आल्यास तेथील आस्थापनांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.