दोडामार्गात केरळीयनांच्या बेकायदेशीर इमारती
By admin | Published: May 18, 2015 10:55 PM2015-05-18T22:55:25+5:302015-05-19T00:27:45+5:30
जंगलतोड सुरूच : मनसेने घेतली प्रांताधिकाऱ्यांची भेट; कारवाईची मागणी
सावंतवाडी : दोडामार्ग येथे वनक्षेत्रात केरळीयन व इतर लोकांनी अतिक्रमण करून जंगलतोड करून इमारतीचे बेकायदेशीर बांधकाम केले आहे. या सर्वावर कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दोडामार्गचे तहसीलदार संतोष जाधव व वनक्षेत्रपाल बी. एस. शिंदे यांना दिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध मागण्यांसंदर्भात येथील प्रांताधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी मनसे कोकण संघटक अध्यक्ष परशुराम उपरकर, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, दोडामार्ग वनक्षेत्रपाल बी. एस. शिंदे, उपविभागीय अभियंता एम. आर. चिटणीस, मनसे तालुका उपाध्यक्ष गुरुदास गवंडे, जनहित जिल्हा उपाध्यक्ष दत्ताराम गावकर, महिला जिल्हाध्यक्ष श्रेया देसाई आदी उपस्थित होते.
उच्च न्यायालयाचे निर्बंध असताना वन अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर वृक्षतोड करण्यात येत आहे. वृक्षतोड पकडून गाडी दिली, तरी अधिकारी गाडी सोडतात, असा आरोप मनसेतर्फे करण्यात आला. याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकारी इनामदार यांनी दिले. दोडामार्ग तालुक्यात होत असलेले अतिक्रमण यावर कडक कारवाई होईल, असे आश्वासन देण्यात आले.
मणेरी येथून पाणी उपसा करून ते वेंगुर्लेपर्यंत नेण्यासाठी घालण्यात आलेली पाईपलाईन १५ मे रोजी फुटून पाणी घरांमध्ये जाऊन नुकसान झालेल्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा, असे आदेश तहसीलदार संतोष जाधव यांना देण्यात आले. या पाण्यापासून झालेल्या नुकसान भरपाई देण्यात येईल, असे यावेळी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दोडामार्ग तालुक्यातील आजपर्यंत केलेल्या रस्ते निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. शिवाय कार्यकारी अभियंता प्रकाश शिंदे यांनी बैठकीस अनुपस्थिती दर्शविल्याने त्यांना नोटीस काढण्यात येईल, असे प्रांताधिकारी इनामदार यांनी सांगितले. (वार्ताहर)
मणेरीत जंगलात हॉटेल
मणेरी येथील धनगर वस्तीजवळ जंगलात हॉटेल उभारण्यात आले आहे. याठिकाणी रात्री १० वाजल्यानंतर ३० ते ४० गाड्या हॉटेलकडे येत असतात. रात्री उशिरा याठिकाणी रेव पार्टीचे आयोजन केले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. यासंदर्भात गांभीर्याने तपास करावा, अशी मागणी उपरकर यांनी केली. याबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रांताधिकारी इनामदार यांनी दिले.