मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून घेताहेत बेकायदेशीर फी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2016 11:40 PM2016-07-07T23:40:41+5:302016-07-08T00:58:36+5:30
अकरावी प्रवेश : ‘त्या’ संस्थाचालक, प्राचार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अकरावी प्रवेशासाठी नाममात्र ३०० रुपये घेतले जावेत असे शासनाचे आदेश असतानाही सध्या जिल्ह्यात प्रति विद्यार्थी महाविद्यालयांमधून ५ ते १० हजारांपर्यंत बेकायदेशीर फी वसूल केली जात आहे, असा आरोप करत सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने मुख्यालयात परिषद घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत दखल न घेतल्यास विद्यार्थ्यांना लुबाडणाऱ्या संस्थाचालक व प्राचार्यांवर गुन्हा दाखल करावा यासाठी त्या त्या पोलिस स्टेशनला धडक देणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रणव देऊलकर व सचिव ज्योती तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ३५० विद्यार्थी उपस्थित होते.
सत्यशोधक विद्यार्थी संघटनेमार्फत गुरुवारी विविध प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. परंतु जिल्ह्यात मनाई आदेश असल्यामुळे पोलिसांच्या विनंतीनुसार मोर्चाचे रुपांतर परिषदेत करण्यात आले. यावेळी किशोर जाधव, अंकुश कदम, प्रा. गोपाळ दुखंडे यांच्यासह जिल्हाभरातून सुमारे ३५० विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष प्रणव देऊलकर व सचिव ज्योती तांबे म्हणाले, संस्थाचालक व महाविद्यालये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीररित्या वारेमाप फी उकळत आहेत. मुंबई विद्यापीठात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ३०० ते ३५० रुपयात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळतो. मात्र सिंधुदुर्गात याच प्रवेशासाठी हजारो रुपये घेतले जात आहेत. अशा महाविद्यालयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. त्या संस्थेचे अनुदान स्थगित करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा नसल्याने मागासवर्गीय शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी प्रचंड कोंडीत सापडले आहेत. गतवर्षीची शिष्यवृत्ती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे भारत सरकार शिष्यवृत्तीचे अर्ज भरून घेण्याची सक्ती महाविद्यालयांना करण्यात यावी. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी डिसेंबर महिन्यापर्यंत वाट पहावी लागते. म्हणूनच विभागीय पातळीवर वसतिगृह सुरु करण्यात यावीत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी आंबेडकरी जनतेचे अस्मितेचे केंद्र असलेल्या दादर येथील आंबेडकर भवन दगाबाजीने पाडणाऱ्या माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना तत्काळ अटक करून गुन्हे दाखल करण्यासाठीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. (प्रतिनिधी)