अवैध दारू पकडली, एकाला अटक : उत्पादन शुल्कची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 12:15 PM2020-10-03T12:15:06+5:302020-10-03T12:16:33+5:30
सावंतवाडी - मळगाव मार्गावर रेल्वे स्टेशनसमोर गोव्यातून बेकायदा केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीच्या दारु वाहतुकीविरोधात उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली.
बांदा : सावंतवाडी - मळगाव मार्गावर रेल्वे स्टेशनसमोर गोव्यातून बेकायदा केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीच्या दारु वाहतुकीविरोधात उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली.
या कारवाईत विविध ब्रँडचे ५५ खोके व दारु वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण ७ लाख ६३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आंतोन लॉरेन्स रॉड्रिग्स (३७, किनळे, ता. सावंतवाडी) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्यातून मळगावमार्गे सावंतवाडी अशी दारू वाहतूक होणार असल्याची माहिती कोल्हापूर भरारी पथकाला खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार कोल्हापूर विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मळगाव रेल्वे स्टेशनसमोर सापळा रचला होता.
मळगावहून सावंतवाडीकडे जाणारी कार (जीए ०५, डी २४८२) तपासणीसाठी थांबविण्यात आली. तपासणी दरम्यान कारमध्ये विविध ब्रँडचे तब्बल ५५ खोके आढळले. दारू व कार असा एकूण ७ लाख ६३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी आंतोन रॉड्रिग्ज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई कोल्हापूर विभागीय उपायुक्त यशवंत पवार व जिल्हा अधीक्षक डॉ. डी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. एस. साळवे, उपनिरीक्षक जितेंद्र पवार, कुमार कोळी, अमित जगताप, जवान सुहास वरुटे, सुखदेव सीद, प्रदीप गुरव व दीपक कापसे यांच्या पथकाने केली.