बेकायदा दारू वाहतूक करणारी कार पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 04:29 PM2019-10-11T16:29:03+5:302019-10-11T16:32:50+5:30
गोवा बनावटीच्या दारुची अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्या कारचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने थरारक पाठलाग केला. मात्र कारचा वेग जास्त असल्याने या कार चालकाने एका शिक्षकाच्या दुचाकीला धडक दिली.
सावंतवाडी : गोवा बनावटीच्या दारुची अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्या कारचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने थरारक पाठलाग केला. मात्र कारचा वेग जास्त असल्याने या कार चालकाने एका शिक्षकाच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत निवृत्त शिक्षक गंभीर जखमी झाले असून, उत्पादन शुल्क विभागाने मात्र कारचालक गणपत प्रभाकर माईणकर याला ताब्यात घेतले आहे. ही घटना मळेवाड कोंडुरे येथे घडली.
उत्पादन शुल्क विभागाला गोवा बनावटीची दारू गोव्यातून येणार अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे सातार्डा येथे सापळा रचला होता. त्याप्रमाणे एक कार सातार्डामार्गे मळेवाड कोंडुरेच्या दिशेने जाण्यासाठी आली असता त्या कारचा पाठलाग उत्पादन शुल्क विभागाने केला. त्यावेळी या कारचा चालक गणपत माईणकर याने गाडीचा वेग वाढविला.
त्याचवेळी कारची धडक आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूल कोंडुरेचे माजी मुख्याध्यापक विठ्ठल येजरे यांच्या दुचाकीला बसली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारार्थ मळेवाड प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले आहे. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने अपघातानंतर ही कार चालकासह ताब्यात घेतली.
या कारमध्ये अनधिकृत दारूचे २५ खोके मिळून सुमारे ९६ हजार रुपयांची दारू व गाडी मिळून १ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी माईणकर याला अटक केल्यानंतर येथील सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती विभागाचे निरीक्षक सत्यवान भगत यांनी दिली. या कारवाईत भगत यांच्यासह पोलीस साळुंखे यांनी सहभाग घेतला. सातार्डा पोलीस चौकीवर माईणकर याची गाडी रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला.