ओरोस परिसरात साग, कांदळवन झाडांची अवैध तोड
By admin | Published: April 10, 2015 12:05 AM2015-04-10T00:05:32+5:302015-04-10T00:25:33+5:30
वनविभागाची कारवाई : राजरोस तोड; ११४ नगांचा ढीग आढळला; बाजारभावाने १० लाख किंमत
ओरोस : ओरोस डोंगरेवाडी, वर्दे कुंभारवाडी येथील नदीपात्रात कांदळवन व साग या झाडांची राजरोस तोड झाली असून, लाकडाच्या ११४ नगांचा ढीग आढळून आला आहे. शासकीय दराने त्याची एक ते दोन लाख रुपये किंमत असून, बाजारभावानुसार त्यांची ९ ते १० लाख रुपये किंमत आहे. या झाडांची बेकायदेशीरपणे तोड झाल्याचे उघड झाले आहे. वनविभागाने ही कारवाई गुरुवारी केली.
कुडाळ तालुक्यातील ओरोस डोंगरेवाडी व वर्दे कुंभारवाडी येथे रस्त्यापासून काही अंतरावर पांढरा ऐन, साग आणि कांदळवन यासह मोठ्या प्रमाणात ६३ नगांची तोड झाल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे नदीपात्रानजीक ५१ नग तोडलेल्या स्थितीत आढळून आले आहेत. नदीपात्रातील वाळू उत्खननावर बंदी आहे. परंतु, नदीपात्रानजीक राजरोसपणे झाडांची विनापरवाना तोड होत असताना आणि हाकेच्या अंतरावर कडावल वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोठे कार्यालय असून, या झाडांबाबत हे कर्मचारी डोळेझाक करीत आहेत. मात्र, काही ग्रामस्थांनी कुडाळ शिवसेना शाखा कार्यालयात जाऊन सुनील राऊळ, नितीन सावंत यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्याने येथील शिवसैनिकांनी अचानक धाड टाकून वनविभागाची विनापरवाना झालेली तोड कडावल वन अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. या मालाची पंच यादी घालून वन कर्मचारी, अधिकारी यांनी माल जप्त केला आहे. दरम्यान, राजरोसपणे जंगली झाडे व अन्य झाडे तोडून नेत असल्याचा आरोप शिवसैनिक सुनील राऊळ यांनी केला आहे.
वनविभागाच्या कारवाईत कडावल वनक्षेत्रपाल आर. एस. कांबळे, वनपाल एस. बी. जाधव, सी. के. राऊळ, एस. जी. फर्नांडिस यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. ही झाडे कोणाच्या मालकीची आहेत याबाबत चौकशी करण्यात येत आहे.