दोऱ्यांच्या साहाय्याने साकारली छत्रपती शिवरायांची प्रतिमा, सिंधुदुर्गातील श्रेया चांदरकरची अप्रतिम कलाकृती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 06:43 PM2023-03-10T18:43:41+5:302023-03-10T18:44:03+5:30
रंगीत दोऱ्यांच्या साहाय्याने विणलेले छत्रपती शिवरायांचे चित्र सिंधुदुर्गातच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिले असावे
चौके : धागा धागा अखंड विणूया, छत्रपती शिवराय मुखे म्हणूया... मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथे इयत्ता आठवीमध्ये शिकणारी श्रेया समीर चांदरकर हिने एक-एक धागा जोडत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा भारतभर विविध रूपांमध्ये साकारल्या गेल्या. काहींनी भव्य रांगोळ्यांमधून, पेंटिंगमधून, कोलाज चित्रांच्या माध्यमातून; तर प्रत्यक्ष शेतामध्ये छत्रपती शिवरायांचे रूप साकारले; परंतु एखाद्या शाळकरी मुलीने विविध रंगीत दोऱ्यांच्या साहाय्याने विणलेले छत्रपती शिवरायांचे चित्र सिंधुदुर्गातच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिले असावे.
जवळपास पाच दिवस अथक परिश्रम घेत तिने हे चित्र पूर्ण केले, अशी माहिती समीर चांदरकर यांनी दिली. सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा असल्यामुळे शाळा एकवेळ भरते. घरी लवकर आल्यामुळे श्रेयाने या वेळेचा सदुपयोग करीत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली. यासाठी जवळपास १०० विविध रंगांच्या दोऱ्यांचा तिने वापर केला. या कलाकृतीसाठी श्रेयाला तिचे वडील वराडकर हायस्कूलचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांचे मार्गदर्शन लाभले.